मुतारीच्या शोधात तरुणाचा जीव गेला धोक्यात! लघुशंकेला गेला अन् गटारीत फसला; बापूंच्या स्मारकामागील करुण घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोट्यवधींची बाजारपेठ आणि लाखावर लोकसंख्या असूनही सार्वजनिक प्रसाधनगृहांचा अभाव असलेल्या संगमनेरात ‘मुतारी’च्या शोधात तरुणाचा जीवच धोक्यात आला होता. सुर्दैवाने सोबतीला जोडीदार असल्याने बराचवेळ लघुशंकेला गेलेला मित्र का परतला नाही याची पडताळणी झाली आणि हा भयानक प्रकार समोर आला. या दरम्यान ‘घायल’ चित्रपटातील एका प्रसंगात हिरोच्या जोडीदाराचा गटाराच्या जाळीत पाय फसावा आणि अखेर त्याचा पोलीस गोळीबारात बळी जावा असाच काहीसा प्रत्यक्ष प्रसंग उभा राहीला. नूतन नगरसेवक गणेश गुंजाळ यांच्यासह काहींच्या मदतीने अखेर तासभर गटाराच्या तुटलेल्या जाळीत पाय अडकून रक्तबंबाळ अवस्थेत बापूंच्या स्मारकामागेच वेदनेने विव्हळणार्‍या ‘त्या’ तरुणाची सुटका झाली.


पूर्वी गावठाणाच्या हद्दिपर्यंत मर्यादीत असूनही संगमनेर शहराच्या जवळजवळ सर्वच प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक प्रशाधनगृहांची (मुतारी) व्यवस्था होती. संगमनेरच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्व असल्याने शहरात आसपासच्या तालुक्यांमधील नागरिकांचाही मोठा राबता असतो. या गोष्टींचा विचार करुनच तत्कालीन प्रशासकांनी अशाप्रकारची व्यवस्था करुन ठेवली होती. मात्र वाढते शहरीकरण आणि त्यात अशाप्रकारच्या प्रसाधनगृहांना लावण्यासाठी होणारा विरोध यातून गावठाणात अस्तित्वात असलेल्या मुतार्‍या टप्प्याटप्प्याने राजकीय बळ वापरुन गायब झाल्या. शहराच्या आसपासच्या उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात मानवी वस्त्या दाटल्या, मात्र सार्वजनिक प्रसाधनगृहांबाबत कोणतेही गांभीर्य विचारात घेतले गेले नाही. त्याचा परिणाम संगमनेरात बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची मोठी कुंचबना होते आणि त्यातून संकुचितपणा, वाद आणि दुर्घटनाही घडत आहेत.


मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुतारीच्या शोधात घडलेली अशीच दुर्दैवी घटना समोर आली. दोघे तरुण बसस्थानकावर चहा घेण्यासाठी आले असता त्यातील एकाने लघुशंकेला जाण्यासाठी बसस्थानकातील अंतर्गत प्रसाधनगृहाशिवाय नवीन नगररस्त्याच्या वळणावरील महात्मा गांधी यांच्या स्मारकाच्या मागील मुतारीचा पर्याय निवडला. जगाला अहिंसेचा मंत्र देणार्‍या बापूंचे चित्र काढून त्याला स्मारकाचा दर्जा देण्यात आलेल्या या भिंतीच्या बरोबर पाठीमागे नाल्यावर लोखंडी जाळी टाकून पालिकेने मुतारी मार्ग तयार केला आहे. त्यावरुन हा तरुण मुतारीच्या दिशेने जात असताना अचानक गंजून तुटलेल्या एका जाळीतून त्याच्या पायाची पोटरी फाडीत त्याचा एक पाय गटारात गेला.


कोणाच्याही दृष्टीआड आणि बहुतेक प्रसंगात क्वचित वापरात असलेल्या या आडवळणाच्या अंधार्‍या बाजूला घडलेला हा प्रकार तसा कोणाच्याही लक्षात न येणाराच. त्यामुळे घोट्यापासून गुडघ्यापर्यंत कापत नेवून गटारात पाय फसलेला तो तरुण मोठमोठ्याने विव्हळत मदतीसाठी टाहो ओडत राहीला. मात्र गटाराच्या त्या घाणेरड्या बोळातून त्याचा आवाज सरळ अकाशाच्या दिशेने निघून जात असल्याने कोणाच्याही कानी पडला नाही. या दरम्यान त्यानेही आपला फसलेला पाय स्वतः काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वारंवार अपयशी ठरला. बराचवेळ होवूनही समोरच लघुशंकेला गेलेला आपला मित्र का आला नाही याची शंका आल्याने त्याच्या जोडीदाराने मोबाईलही केला, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने थेट गचपणात असलेल्या मुतारीकडे जावून पाहीले असता घडला प्रकार समोर आला.


या गदारोळात जखमी तरुणाचा मोबाईलही गटारात पडल्याने तो संपर्कहीन झाल्याचे समोर आले. त्यातून त्याचा जोडीदार सोबत नसता तर काय झाले असता? असा थरकाप उडवणारा प्रसंगही उभा राहीला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सुरुवातीला त्याच्या मित्राने व नंतर नूतन नगरसेवक गणेश गुंजाळ यांच्या मदतीने पालिकेच्या कर्मचार्‍यांनी जवळपास तासाभराने ‘त्या’ तरुणाची प्रचंड वेदनेतून सुटका केली आणि त्याला रुग्णालयात नेवून वैद्यकीय उपचार केले. हा प्रकार शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची गरज अधोरेखीत करणारा असून पुढार्‍यांनी राजकारणविरहित या समस्येकडे पाहण्याची गरज आहे.


सदरची घटना बसस्थानकासमोरील नवीन नगररस्त्याच्या वळणावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या चित्राच्या पाठीमागील बाजूस घडली. पालिकेच्या बॉटीनिकल उद्यानाच्या बाजूने गटाराकडे जाण्यासाठी पालिकेने लोखंडी जाळी बसवली असून पाठीमागील बाजूला मुतारी आहे. त्याच मुतारीकडे जाताना ही घटना घडली आणि त्यातून एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. सुर्दैवाने त्याच्यासोबत जोडीदार असल्याने मोबाईलचा संपर्क होत नसल्याचे पाहून त्याने माहिती असलेल्या ठिकाणावर जावून त्याचा शोध घेतला. हाच प्रकार तो तरुण एकटाच परिसरात आल्यानंतर घडला असता तर काय झाले असते? या गोष्टीचा ‘संगमनेर 2.0’ मध्ये गांभीर्याने विचार होईल अशी अपेक्षा आहे.

Visits: 210 Today: 6 Total: 1414139

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *