आंबेवंगणच्या शांताबाई धांडे शेतकर्‍यांसाठी ठरताहेत नवदुर्गा शाश्वत शेतीचे मॉडेल उभे करुन करताहेत क्लायमेट स्मार्ट शेती


नायक वृत्तसेवा, अकोले
सह्याद्रीच्या कुशीत दूर डोंगरमाथ्यावर वसलेल्या आंबेवंगण (ता. अकोले) या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडविला आहे. भात या पारंपरिक पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ घडवून आणली आहे. याशिवाय शाश्वत शेतीचे दर्जेदार मॉडेल उभे करुन क्लायमेट स्मार्ट शेती उभी केली आहे. आदिवासी भागातील शेतकर्‍यांसाठी त्या शेतीतील नवदुर्गा ठरत आहेत.

आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे भात हे मुख्य पीक असल्याने चरितार्थाचे मुख्य पीक मानले जाते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात पिकाची लागवड केली जायची. त्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे, मजूर आणि रासायनिक खते व औषधांचा मोठा वापर केला जात होता. त्यामुळे भात शेती खूप खर्चिक आणि उत्पन्नाच्या बाबतीत तोट्याची होत चालली होती. या पद्धतीने एकरी सरासरी फक्त 10 ते 12 क्विंटल उत्पन्न मिळत असे. या परिस्थितीत उत्पादन घटत होते आणि जमिनीही रासायनिक खतांच्या अतिवापरण्याने खराब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अशिक्षित अशा शांताबाई धांडेंनी पुढे येत उत्पादन कसे वाढेल याची माहिती घेण्यास सुरवात केली.

बायफ संस्थेबरोबर कार्य सुरू करून त्यांच्या तज्ज्ञांकडून भात लागवडीच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. भात शेतीत चारसूत्री, एसआरटी, एसआरआय या सुधारित लागवड पद्धतींचा अवलंब करत त्यांनी भात शेती फायद्याची केली. शेतीत केलेले बदल भात उत्पादन दुपटीने वाढवत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बायफमार्फत स्थापित आदिवासी महिलांचे स्वयंसहायता समूह यांच्या मदतीने भात लागवडीचे हे तंत्रज्ञान गावोगावी नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याकडे येणार्‍या शेतकर्‍यांच्या अभ्यास सहली, शेतकर्‍यांच्या भेटी, गटचर्चा, महिला मेळावे, शेतकरी मेळावे पीक प्रात्यक्षिके यांच्या माध्यमाने त्यांनी भात लागवडीच्या या तीनही तंत्रज्ञानाचा आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे.

आपले शेत संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकविले जावे ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी सर्वप्रथम गांडूळ खत निर्मिती आपल्या घराच्या अंगणात सुरू केली. चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून भात लागवड सुरुवात केली. यासाठी बायफच्या कृषीतज्ज्ञांनी त्यांना केली. चारसूत्री पद्धतीने प्रथमच या भागांमध्ये भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि वर्ष 2014 मध्ये त्यांना सुमारे 33 टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या संपूर्ण भात शेतीमध्ये बदल घडवून आणला. चारसूत्री सोबतच जी जंगलांना लागून आणि पाणी न थांबणारी भात खाचरे आहेत त्यामध्ये एसआरटी आणि एसआरआय या सुधारित भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला. त्यापासूनही त्यांना उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विशेष कार्याने आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराने परिसरातील गरीब आदिवासी शेतकर्‍यांचे भात उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे. त्या स्वतः इंद्रायणी, फुले, समृद्धी, जिरवेल, आंबेमोहर, काळभात इत्यादी सुवासिक वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

याशिवाय त्यांनी आपल्या घरासमोर अतिशय सुंदर परसबाग फुलवली आहे. या परसबागेत विविध प्रकारचे बहुवर्षायू वनस्पतींची लागवड केली आहे. आंबा, पेरू, फणस , काजू, सीताफळ, बोर, अंजीर, हादगा, शेवगा, पपई, करवंद, गवती चहा, लिंबू, रामफळ, म्हाळुंगी इत्यादी वनस्पतींचा त्यात समावेश आहे. हंगामी परसबागेच्या त्या मास्टर आहेत. त्यांच्या परसबागेत नानाविध प्रकारच्या 50 ते 60 गावठी भाज्यांचे उत्पादनही दरवर्षी त्या घेतात. कंपोष्ट खत निर्मिती, जीवामृत, बीजामृत, जिवाणू खतांचा वापर, पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धतीचा अवलंब, हवामान बदलावर आधारित शेती, वनशेती असे अनेक यशस्वी प्रयोग त्यांनी आपल्या शेतावर राबवले आहेत. शेतीतून शाश्वत उत्पन्न काढताना त्यांनी बचत गटांच्या महिलांना हे तंत्रज्ञान अवगत करून दिले आहे. आत्तापर्यंत त्यांच्या शेताला सुमारे पाच ते सात हजार शेतकर्‍यांनी भेटी देऊन अनुकरण केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नवदुर्गा शांताबाई धांडे यांनी उभे केलेले शाश्वत शेतीचे मॉडेल आदिवासी भागातील शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

Visits: 146 Today: 2 Total: 1112891

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *