संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 61 वे शतक! ग्रामीणभागातील रुग्णवाढीची सरासरी आठ महिन्यात पहिल्यांदाच एकेरीत!!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याच्या सुरुवातीपासून दैनंदिन समोर येणार्या कोविड बाधितांच्या संख्येत चढ-उतार बघायला मिळाला. गेल्या सात दिवसांच्या कालावधीत दोन दिवस सलग घटती तर तिसर्या दिवशी अचानक वाढलेली रुग्णसंख्या अशा क्रमाने कोविडचा आलेख हलता राहीला. मागील महिन्यातील आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सात दिवसांतील सरासरी रुग्णगती पाहता नववर्षाने खूप मोठा दिलासा दिल्याचे समाधानकारक चित्र सध्या दिसत आहे. बुधवारी अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याने गुरुवारी सरासरी उंचावली होती, मात्र गुरुवारच्या अहवालाने संक्रमणाचा वेग पुन्हा नियंत्रणात आणल्याचे दिसत आहे. गुरुवारी शहरातील केवळ एकासह तालुक्यातील एकूण आठजण संक्रमित झाले. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आता 61 वे शतक पार करुन 6 हजार 101 वर पोहोचली आहे.
![]()
दिवाळीच्या गर्दीचा प्रभाव म्हणून नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून तालुक्यातील कोविड संक्रमणात मोठी झाल्याचे दिसून आले. त्यावेळी कोविडची दुसरी लाट म्हणूनच वाढलेल्या सरासरीकडे बघितले गेले. प्रशासकीय पातळीवरुनही त्या दृष्टीनेच वारंवार आरोग्य सुविधांचा आढावा घेतला गेला. मात्र जे अपेक्षित होतं ते घडलंच नाही. नागरिकांच्या दुर्लक्षातून दिवाळीने वाढवलेली रुग्णगती डिसेंबरच्या दुसर्याच आठवड्यात आटोक्यात आली, आणि दररोजची सरासरी जवळपास पुन्हा नियंत्रित झाल्याचे दिसू लागले. चालू महिन्याने तर सुरुवातीच्या आठवड्यातच मोठा दिलासा दिल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून चढत्याक्रमाने सहा हजार शंभर रुग्णांचा डोंगर पाहिलेल्या तालुक्यात काहीसे सुखदायक चित्र दिसत आहे.
रुग्णसंख्या घटत असली तरीही रुग्ण समोर येण्याची श्रृंखला थांबलेली नाही याचे प्रत्येकाने स्मरण ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्या सात दिवसांतील आकडेवारी हेच सांगते. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत तालुक्यात दररोज सरासरी 12.43 वेगाने 87 रुग्णांची भर पडली. या कालावधीतील सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे शहरी रुग्णगतीच्या सरासरीत मोठी घट होवून गेल्या सात दिवसांत शहरातून अवघ्या 3.86 च्या सरासरीने 27 तर ग्रामीण क्षेत्रात आठ महिन्यानंतर पहिल्यांदा एकेरीत म्हणजे केवळ 8.57 च्या सरासरीने 60 रुग्णांची वाढ झाली. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोविडची मोठ्या प्रमाणात माघार होत असल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून त्या विरोधातील लढ्याचा विजय दृष्टीपथात आहे. मात्र असे असले तरीही त्याचा धोका मात्र अजिबात टळलेला नाही. ‘जब तक दवाई नहीं, तक तक ढिलाई नहीं’ याचे प्रत्येकाने स्मरण ठेवणे आवश्यक आहे.

गेल्या सात दिवसांत 1 जानेवारी रोजी एकूण सहा रुग्ण, त्यात दोघे शहरातील. 2 जानेवारी रोजी एकूण 9 त्यात शहरातील पाच. 3 जानेवारी रोजी एकूण 22 त्यात शहरातील चार. 4 जानेवारी निरंक. 5 जानेवारी रोजी एकूण 18 रुग्ण, त्यात शहरातील आठ. 6 जानेवारी रोजी 24 रुग्ण, त्यात शहरातील सात. तर 7 जानेवारी रोजी आठ रुग्ण आढळून आले त्यात शहरातील केवळ एका रुग्णाचा समावेश होता. गेल्या सात दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 87 रुग्णांची भर पडली. यातील 27 रुग्ण शहरातील तर 60 रुग्ण ग्रामीभागातील आहेत.

गुरुवारी (ता.7) आढळलेल्या एकूण आठ रुग्णांमध्ये शहरातील चंद्रशेखर चौक परिसरात राहणार्या 23 वर्षीय तरुणासह ग्रामीण भागातील घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगर येथील 75, 44 व 23 वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथील 44 वर्षीय तरुण, दाढ खुर्द येथील 32 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 79 वर्षीय वयोवृद्ध नागरिक व झरेकाठी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोविडची लागण झाली आहे. गुरुवारी वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुक्यातील एकूण बाधित संख्येला 61 व्या शतकापार नेत 6 हजार 101 वर पोहोचवले आहे.

दृष्टीपथात असलेली कोविड लस आणि त्यातच ओहोटीला लागलेला प्रादुर्भाव यामुळे नागरिक उत्साहात आहेत. मात्र या उत्साहातून नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे विपरित परिणामही समोर यायला वेळ लागणार नाही. नववर्षाचा सूर्य संपूर्ण देशासाठी आशेची किरणं घेवून उगवला आहे. त्याचा प्रत्यय संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीत झालेली लक्ष्यनीय घट पाहून सहज येतो. गेल्या आठ महिन्यात उंचावत गेलेले ग्रामीणभागातील रुग्णसंख्या प्रत्येक महिन्यात दुहेरीच होती. मात्र नववर्षाच्या पहिल्या सात दिवसांत चित्र बदलले असून शहरी रुग्णगती चारपेक्षा तर ग्रामीण रुग्णगती नऊपेक्षा खाली आल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र दिसत आहे. ग्रामीण रुग्णगती एकेरीत यावी ही गोष्ट संपूर्ण तालुक्यासाठी समाधानकारक आहे. प्रत्यक्ष लसीकरणापर्यंत नियमांचे पालन केल्यास कोविड विरोधातील वैश्विक युद्धाचा परिणाम दृष्टीपथात आहे.

