खंदरमाळवाडी शिवारात कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार; सात गंभीर जखमी अपघातानंतर मुजोर चालकाचे कार पशुलपालकाच्या अंगावर घालण्याचे धाडस
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळडी शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल येथे शुक्रवारी (ता.8) सकाळच्या वेळी बेदरकारपणे कार चालविणार्या चालकाने शेळ्यांना धडक दिल्याने दोन शेळ्या जागीच गतप्राण झाल्या. तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर कारचालकाला थांबविण्याचा अटोकाट प्रयत्नही केला; परंतु मुजोर कारचालकाने कार न थांबवता थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन पळून गेला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खंदरमाळवाडी शिवारातील गोकुळवाडी येथे सदाशिव बबन लेंडे हे शेतकरी तथा पशुपालक नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या शेळ्या चारण्यासाठी एकोणावीस मैल येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते. त्याचवेळी पाठीमागून बेदरकारपणे भरधाव वेगात येत असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट शेळ्यांच्या कळपात घुसली आणि दोन शेळ्यांचा जीव घेतला. तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर पशुपालक लेंडे यांनी कारचालकाला काठीच्या माध्यमातून थांबविण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. परंतु, कारचालकाने कार न थांबविता कार थेट लेंडे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन पळून गेला आहे.
सदर अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना काही शेळ्यांचा पाय मोडलेला तर काहींच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे दिसले. जखमी झालेल्या सर्व शेळ्यांना बाजूला घेऊन तात्काळ खासगी पशुवैद्यकांना पाचारण केले. या अपघाताची माहिती उपस्थित नागरिकांनी घारगाव पोलिसांना दिली आहे. यामध्ये पशुपालक लेंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आणि मुक्या जीवांना मुकल्याने नातवासह जागेवरच रडू कोसळले.
एकीकडे जखमी मुक्या जीवांना वाचविण्यासाठी पशु-पक्षीप्रेमी जीवाचा आटापिटा करतात. तर दुसरीकडे क्ररतेने त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटनाही समोर येतात. याचीच पुनरावृत्ती आजच्या अपघातातून दिसून आली आहे. अपघातानंतर साधी विचारपूसही न करता निष्ठूर आणि निर्दयी कारचालक अपघातस्थळावरुन पळून गेला. यामध्ये मुक्या जीवांना गमाविण्याबरोबरच पशुपालक लेंडे यांची आर्थिक घडीही विस्कटणार नाही.