राहुरीमध्ये माजी नगरसेविकेवर गोळीबार; गंभीर जखमी अहमदनगर येथे उपचार सुरू; चौघे पोलिसांच्या ताब्यात

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात शुक्रवारी (ता.18) दुपारी दोन वाजता प्रगती शाळेसमोरील आदिवासी समाजाच्या वसाहतीत गावठी पिस्तूलातून गोळीबार झाला. त्यात, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

राहुरी शहरातील प्रगती शाळेसमोरील आदिवासी वसाहतीमध्ये शेजारी राहणार्या दोन कुटुंबांत जोरदार भांडण झाले. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलांच्या कारणावरुन दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. नामदेव पवार, अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, सुरेश नामदेव पवार यांचे शेजारी राहणार्या सोनाली बर्डे व त्यांच्या पती समवेत जोरदार भांडण झाले. अंकुश पवार याने गावठी पिस्तूल काढून सर्वांसमक्ष गोळीबार केला. यावेळी सोनाली बर्डे यांच्या कडेवर लहान मुलगा असल्याचे समजते.

पिस्तूलाची गोळी सोनाली बर्डे यांच्या हाताच्या मनगट व कोपरामध्ये लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी अवस्थेत सोनाली बर्डे यांना नगर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, राहुरी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
