होय, विधानसभेत झालेला पराभव आम्हाला मान्य आहे! आमदार सत्यजीत तांबे यांची जाहीर कबुली; तुम्ही सत्ताधारी तर, आम्ही विरोधक नसल्याचीही गुगली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे आणि आमचा पराभव केला आहे. तो आम्ही मोठ्या मनाने मान्य केला आहे’ अशी पहिल्यांदाच जाहीर कबुली देत आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी सगळ्यांनाच आश्‍चर्यचकीत केले. घुलेवाडीतील कीर्तनातून सुरु झालेल्या राजकीय संघर्षात नथुरामाच्या नावाचा वापर करुन थेट माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकावण्यापर्यंत प्रकरण पोहोचल्याने थोरात समर्थक संतप्त झाले होते. त्या विरोधात गुरुवारी शहरातून ‘शांती मोर्चा’ काढून धमकी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार तांबे यांनी वरील वक्तव्य करताना आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता मिळालेल्या संधीचे सोने करण्याचाही सल्ला दिला. यावेळी त्यांनी ‘तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर, आम्हीही विरोधक नाही’ अशी गुगली टाकीत पुन्हा एकदा राजकीय संभ्रमही निर्माण केला.


विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पराभव मान्य केला गेला नसल्याचा आरोप वारंवार त्यांच्यावर केला जात होता. गुरुवारी (ता.21) घुलेवाडी प्रकरणातील कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी माजीमंत्री थोरात यांना व्हिडिओद्वारा नथुराम होवून अद्दल घडवण्याची धमकी दिल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले. तत्पूर्वी सत्ताधारी गटाकडून या कीर्तनात छत्रपतींचा पराक्रम सांगितला जात असताना जाणीवपूर्वक थोरात समर्थकांनी व्यत्यय आणून कीर्तन बंद पाडल्याचा आरोप करुन त्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी विविध वक्त्यांनी माजीमंत्र्यांच्या राजकीय कारकीर्दीचा उल्लेख करीत त्यांना ‘हिंदू द्रोही’ ठरवण्याचा प्रयत्न केला. एकामागून एक घडलेल्या घडामोडी, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्थिरता, त्यात घुलेवाडी प्रकरणात थेट आस्थेचा धागा पकडून सुरु झालेले राजकारण यामुळे माजीमंत्री राजकीयदृष्ट्या काहीसे बॅकफूटवर गेले होते.


मात्र संग्रामबापू भंडारे यांच्याकडून नथूरामाच्या नावाचा उल्लेख करीत धमकीचा व्हिडिओ समोर येताच त्यांना पलटवार करण्याची संधी चालून आली. त्याचे सोने करताना थोरात समर्थकांनी घुलेवाडीतील मारुती मंदिरापासून गावातील रस्ते, हिवरगाव टोलनाका अशा वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळवून या प्रकरणात आरसा दिसेल इथवर पुराव्यांची जुळवाजुळव केली. गुरुवारी मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांसह प्रशासकीय भवन गाठण्यात आले. यावेळी डॉ.कोल्हे नामक समर्थकाने ‘लाव रेऽ तो व्हिडिओ’च्या धर्तीवर घुलेवाडी प्रकरणाचा एकएक धागा उलगडण्यास सुरुवात केली, त्याला समोर मोठ्या संख्येने जमलेल्या समुदायाचा पाठींबा मिळू लागल्याने थोरातांची देहबोली पहिल्यांदाच आक्रमक होताना दिसू लागली. त्यानंतर त्यांनी ‘लाव रेऽ’च्या संयोजकाकडून थेट आपल्याकडेच सूत्रे घेत पुढील विश्‍लेषणही केले आणि आपल्या मनातील भावनाही अतिशय आक्रमकपणे मांडल्या. त्यांचा बदललेला हा भाव खूप काही सांगणारा आणि भविष्यातील राजकारणात अमुलाग्र बदलाचे संकेत देणारा होता.


या निषेध सभेत आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या विषयाला स्पर्श करीत आमदार खताळांचे थेट नाव न घेता; लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, आमचा पराभव झाला आहे, आम्ही मोठ्या मनाने आमचा पराभव मान्य करतो असे सांगत तप्त झालेला माहौल स्तब्ध केला. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या चुकांबद्दल मी जाहीर माफी मागतो, यापुढेही हजारवेळा माफी मागण्यास तयार आहे. जनता कधीच चुकत नसते, चुका आमच्याकडून, आमच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि लोकांकडूनच झाल्या आहेत हे आम्ही मान्य करतो असे जाहीर वक्तव्य करीत त्यांनी नूतन आमदारांना सूचक इशाराही दिला.


लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे असे आमदार खताळ यांचे नाव न घेता सांगताना आमदार सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. तुम्ही तालुक्याच्या राजकारणात वाईट प्रवृत्ती आणून तालुक्याला मागे नेण्याचे काम करणार असाल तर, संगमनेर तालुक्यातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. संधीचे सोने करा, राहीलेली कामे पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्याबद्दल एकमेकांमध्ये दुमत असण्याचे कारण नाही असा राजकीय सल्ला देतानाच ’तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर, मी देखील विरोधी आमदार नाही’ असे सांगत त्यांनी राजकीय गुगलीही टाकली, त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांच्या भुंवयाही उंचावल्या आणि त्यांच्या समर्थकांनी टाळ्या-शिट्ट्यांनी त्याला दादही दिली.


आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आमदार तांबे यांनी ‘घाबरण्याचे कारण नाही’ असे सांगत त्या सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आपण तालुक्यातील प्रत्येक युवक, महिला-भगिनी व संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणीही घाबरुन जाण्याचे काम नसल्याचे ते म्हणाले. साहेबांवर टीका करण्यामागील विरोधकांचा एकमेव उद्देश कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आपण स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे मागे हटायचे नाही असे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्याचाही प्रयत्न केला.


दोन गटात, समाजात अथवा धर्मात झालेले वाद सामंजस्याने सोडवून शांतता कायम राखण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींची असते याकडे लक्ष वेधतांना त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षांच्या राजकारणात हाच सौहार्द टीकवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून त्यांना एका धर्माचे लाड करणारा नेता म्हणून हिणावल्याचा पलटवार करीत आमदार तांबे यांनी यापुढे अशाप्रकारच्या खोटारड्या अपप्रचाराला तितक्याच सक्षमपणे उत्तर देण्याचाही इशाराही दिला. आम्ही देखील हिंदुत्त्ववादीच आहोत, आमचे विचारही हिंदुत्त्ववादीच आहेत, परंतु आमचे हिंदुत्त्व कोणाला अडचणीत आणणारे, दुसर्‍या धर्माला त्रास देणारे नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप खोडण्याचाही त्यांनी जोरकसपणे प्रयत्न केला. थोरात-तांबे मामा-भाच्याकडून शांती मोर्चाच्या समारोपात झालेली भाषणं त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वाधीक आक्रमक असल्याचे दिसून आल्याने त्यातून तालुक्यातील बदलत्या राजकारणाचे संकेतही मिळू लागले आहेत.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाल्याच्या घटनेला जवळपास दहा महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र या कालावधीत थोरात अथवा तांबे परिवाराकडून कधीही पराभव मान्य केला गेला नाही असा विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जात होता. गुरुवारी (ता.21) माजीमंत्री थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या विशाल मोर्चासमोर बोलताना त्यांचे भाचे, अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, आमचा पराभव झाला आहे. आम्ही मोठ्या मनाने तो मान्य करीत आहोत’ असे सांगत त्यांनी गेल्या दहा महिन्यांपासून होत असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासह आगामी कालावधीत थोरात-तांबे यांच्या राजकारणातील आक्रमकपणाही अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Visits: 282 Today: 2 Total: 1114865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *