… अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिराने बांधली लग्नगाठ! वडाळा बहिरोबा येथील मोटे कुटुंबियांच्या निर्णयाला समाजातूनही दाद
नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे विधवा भावजयीसोबत लहान दीर अडकणार विवाह बंधनात. अखेर हे गुरुवारी (ता.7) सत्यात उतरले आहे. भाऊबंद, गावकरी व समाज काय म्हणले याचा कोणताही विचार न करता नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे विधवा भावजयीसोबत लहान दिराने लग्नगाठ बांधून नवा आदर्श उभा केला आहे. या सोहळ्यास उपस्थित असलेल्या वर्हाडींनी देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात नवदाम्पत्याचे स्वागत करुन शुभाशीर्वाद दिले.
विधवा सूनेच्या आयुष्यात दाटलेल्या अंधाराला पुनर्विवाहाच्या निमित्ताने सासर्यांनी प्रकाशाची वाट निर्माण करुन दिली आहे. सर्वसाधारपणे जे लोक किंवा कुटुंब रूढी-परंपरेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतात त्यांना वाळीत टाकले जाते. किंवा नाके तरी मुरडली जातात. परंतु या दीर-भावजयीच्या लग्नगाठीचे समाजाने देखील मोठ्या दिलाने स्वागत केले. या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावरुन सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांच्या कामाला लोकांनी दाद दिली असल्याचे अधोरेखित झाले.
संजय मोटे यांचा अभियंता असलेला थोरला मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्या मागे पत्नी प्रांजली सात महिन्यांच्या बाळासह पोरकी झाली. प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे (राहुरी फॅक्टरी) निशब्द झाले होते. आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते. सासरे संजय मोटे यांनीच यातून मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी विधवा सूनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्रबरोबर निश्चित केला. प्रांजली आणि महेंद्र यांचे मत घेतलं. ते राजी झाल्यानंतर त्यांनी पुढील हालचाली केल्या. आणि गुरुवारी हा अगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.
मोठ्या भावाला यापेक्षा मोठी श्रद्धांजली असूच शकत नाही, असा प्रस्ताव माझ्याकडे मांडण्यात आला. माझे कुटुंबच माझे स्वप्न असल्याने ‘मी’पणा बाजूला ठेवून विवाहास तयार झालो.
– महेंद्र संजय मोटे, वर
माझ्या लहान मुलाचा व विधवा सूनेचा ठरलेला विवाह मोजक्याच लोकांत लपूनछपून एखाद्या मंदिरात केला असता. मात्र, मी समाजापुढे प्रेरणा ठरावी म्हणून मोठ्या थाटात हा विवाह केला आहे. यातून एकाने जरी आदर्श घेतला तरी हे कार्य सफल झाल्याचे समाधान होईल.
– संजय मोटे, वरपिता