कलेतून माणसाचे जीवन समृद्ध होते ः कदम संगमनेर महाविद्यालयात कला महोत्सवाचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच लहानपणापासून गाण्याचे आकर्षण होते. म्हणूनच कलेची जोपासना करत आहे. कला माणसाला काय देते? याचे उत्तर निश्चितच कलेतून माणसाचे जीवन समृद्ध होते असे द्यावे लागेल असे मत ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात उपविजेते ठरलेले अविनाश कदम यांनी व्यक्त केले.
संगमनेर महाविद्यालयातील कला महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, अलीकडील माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते आहे. त्याचबरोबर समाजात दररोज निर्माण होणार्या नवनवीन माध्यमांचा उपयोगही शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. याच्यातूनच कदाचित एखादा सुंदर कलाकारही सहज पुढे येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील सर्वांगीण गुणांचा विकास करावा. महाविद्यालयीन जीवनात एखाद्या कलेची जोपासना करावी. आपण निवडलेल्या कलेचा चांगला सराव करावा, त्याचा फायदा भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित होतो. माणसाच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात त्यावर मात करावी. तसेच आज जगात लोकगीत, अभिजात संगीत याला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे म्हणून कलेची साधना कर असे आवाहन अविनाश कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी कलर्स मराठी वाहिनीवर गायलेल्या कानडा राजा पंढरीचा, एकविरा आई तू डोंगरावरी, एकच राजा इथे गाजला अशा अनेक बहारदार गीतांचे सादरीकरणही केले. त्यांनी सादर केलेल्या गीतांना विद्यार्थ्यांनीही भरभरून दाद दिली. या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष संतोष करवा, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, प्रा. डॉ. संजय नवले (कला मंडळाचे समन्वयक), प्रा. डॉ. उमेश जगदाळे (कला महोत्सव उद्घाटन प्रमुख), प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप आदी मान्यवर उपस्थित होते.