अकोलेनंतर राजूर बसस्थानक अडकले समस्यांच्या विळख्यात! खासगी वाहने आणि छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची होतेय कायमच गर्दी
नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील अकोले बस आगारानंतर सर्वात मोठे बसस्थानक म्हणून राजूर बसस्थानकाची ओळख आहे. त्यातच आदिवासी पट्ट्यातील राजूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने आदिवासी बांधवांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, कायमच समस्यांनी ग्रस्त असलेल्या अकोले आगारानंतर आता राजूर बसस्थानकही समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक परिसरात बिनधास्तपणे खासगी वाहनचालक आपली वाहने लावून फिरतात. यामुळे बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दुर्देवी चित्र दिसत आहे.
राजूर हे आदिवासी पट्ट्यातील नागरिकांचे प्रमुख केंद्र आहे. त्यातच आजी-माजी आमदारांचे निवासस्थानही येथेच आहे. परंतु, येथील बसस्थानक आता समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्याकडे लोकप्रतिनिधी, आगार व्यवस्थापन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दोन्ही बाजूला रस्त्यावर आलेली दुकाने, रस्त्यात बिनधास्तपणे लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने यामुळे बसस्थानकात ये-जा करण्यासाठी बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन बस किंवा मोठी वाहने समोरासमोर आल्यावर तर चालकांना अक्षरशः घाम फुटतो. कधी अपघात होईल याची भीती कायमच सतावत असते. मात्र, लोकप्रतिनिधी, आगार व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
अकोले तालुक्यातील अकोले आगरानंतर सर्वात मोठे बसस्थानक म्हणून राजूर बसस्थानकाची ओळख आहे. मात्र, सध्या हे बसस्थानक खासगी वाहने आणि रस्त्यावर बसणार्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांच्या गर्दीत सापडले आहे. आदिवासी बांधवांची राजूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने त्यांची कायमच येथे वर्दळ असते. परंतु, त्यांनाही या समस्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायमच वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक बराच काळ विस्कळीत होते. तर बेशिस्तीमुळे अपघात घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या समस्यांचे लवकरात लवकर उच्चाटन करुन राजूरकरांचा आणि आदिवासी बांधवांचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.