रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी नाथाबाबा विद्यालयाचा पुढाकार असंख्य वृक्षांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथील श्री गणेश बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेहमीच नवोपक्रम राबवत असतात. यामुळे येथील विद्यार्थी गुणवत्तेतच नव्हे तर विविध कलांगुणांतही पारंगत होत आहे. याअंतर्गतच आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत विद्यार्थिनींनी असंख्य वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
सध्या संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीचे संकट सतावत आहे. याचबरोबर दुष्काळाचा सामनाही करावा लागत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाजी गरज बनली आहे. यासाठी शासन व सेवाभावी स्तरावरुनही प्रयत्न केले जात आहे. शाळा व महाविद्यालये देखील यासाठी झटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून बोटा येथील श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी असंख्य वृक्षांना राख्या बांधून निसर्गाप्रती असलेले भावबंधाचे नाते वृद्धिंगत केले आहे.
कोविड संकटात प्राणवायूची भासलेली कमतरता आणि दुष्काळ यामुळे निसर्गाचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखीत झालेले आहे. त्यांच्याप्रती असलेले प्रेम व जबाबदारी यातून विद्यालयाच्या हरितसेनेच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र जठार, हरितसेना प्रमुख शंकर पानसरे, सुभाष हांडे, अशोक बगाड, आनंदा मधे, अशोक साळवे, सचिन फटांगरे, दीपाली शेळके, रोहिदास घुले, गणेश वाघमारे आदिंनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहनही विद्यार्थिनींनी केले आहे.
टाकाऊ वस्तूंपासून बनविल्या राख्या..
श्री नाथाबाबा विद्यालयातील सातवीच्या विद्यार्थिनींचे राखी बनविण्याचे प्रशिक्षण कलाशिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. त्यानंतर या मुलींनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक राख्या बनविल्या असून त्याच राख्या आज वृक्षांना बांधण्यात आल्या. याचे शिक्षकांसह ग्रामस्थांनी देखील भरभरुन कौतुक केले.