संगमनेरच्या पठारभागात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ! महिन्याभरात लांबविल्या तीन दुचाकी; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (ता.21) पहाटे चोरट्यांनी शेळकेवाडी रस्ता (घारगाव) येथून उमेश नंदकिशोर खोंड यांची दुचाकी चोरून नेली आहे. यापूर्वी देखील चोरट्यांनी जवळेबाळेश्वर, माळेगाव पठार येथून दुचाकी चोरून नेलेल्या आहेत. सततच्या चोर्यांमुळे नागरिक भयभीत झाल्याने पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शेळकेवाडी रस्ता (घारगाव) शिवारात उमेश खोंड यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी (क्रमांक एमएच.17, सीएच.1764) ही नेहमीप्रमाणे घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती. गुरुवारी सकाळी ते शेडमध्ये गेले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. तात्काळ त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती कुठेच मिळून आली नाही. साठ हजार रुपये किंमतीची ही दुचाकी होती. या प्रकरणी उमेश खोंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 19/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू खेडकर हे करत आहे.
दरम्यान बुधवारी (ता.13) पहाटे जवळेबाळेश्वर येथील श्याम सैलू घोडे यांचीही दुचाकी (क्रमांक एमएच.17, सीडी.0215) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. चाळीस हजार रूपये किंमतीची ही दुचाकी होती. त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी माळेगाव पठार येथून रामभाऊ बाळशिराम भोर यांचीही दुचाकी (क्रमांक एमएच.17, बीजी.2149) चोरट्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी चोरून नेली आहे. त्यांनी सगळीकडे शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. यावरुन जवळपास महिनाभराच्या आतमध्ये चोरट्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. यामुळे घारगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून जोर धरु लागली आहे.