कोविडने घेतला संगमनेरातील आणखी एकाचा बळी? मोठा जनसंपर्क असलेला पालिकेचा पदाधिकारीही जायबंदी; मुंबईला हलविले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या सुरुवातीपासून कोविड संक्रमणाचा वेग मंदावल्याचे दिसत असले तरीही त्याची दाहकता मात्र कायम आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत सरासरी अकरा रुग्ण याप्रमाणे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत केवळ 55 रुग्णांची भर पडल्याचा दिलासा असताना माळीवाड्यातील 67 वर्षीय इसमाचा बळी गेल्याची वेदनादायी वार्ता येऊन धडकली आहे. त्या सोबतच दिवसभरात शेकडो जणांच्या गाठीभेटी घेणार्या संगमनेर नगरपालिकेच्या एका जनसेवक पदाधिकार्यालाही कोविडची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना मुंबईत हलविण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांतील दुसरी सर्वाधिक रुग्णसंख्या ठरलेल्या मंगळवारच्या रुग्णसंख्येने एकूण रुग्णसंख्येत अठरा बाधितांची भर घालीत तालुक्याला 6 हजार 69 रुग्णसंख्येवर पोहोचवले आहे.

डिसेंबरमध्ये रुग्णसंख्येतील चढ-उतार दिसल्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीपासूनच दररोज सापडणार्या रुग्णसंख्येत कमालिची घट झाली होती. गेल्या पाच दिवसांत एकूण रुग्णसंख्येत 55 रुग्णांची भर पडली आहे. त्यातील 40 रुग्ण दोन दिवसांत आढळून आले आहेत. आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णसंख्येत शहरातील 18 तर ग्रामीण भागातील 37 रुग्णांचा समावेश आहे. महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येत घट होऊन सरासरी 11 वर आल्याचे समाधानकारक चित्र निर्माण होत असतानाच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी माळीवाडा परिसरातून आढळलेल्या व सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 67 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची वेदनादायी वार्ता येऊन धडकली आहे. सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त होऊन सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्याने स्थानिक प्रशासनाच्या आजवरच्या कोविडमृत्यू नोंद पद्धतीनुसार सदर मृत्यूची गणती कोविड बाधित मृत्यूंमध्ये होणार नाही. नाशिकमधील त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र आज मृत्यू पावलेली व्यक्ती सद्ग्रहस्थ होती आणि त्यांचा संबंध एका सुसंस्कृत कुटुंबातून असल्याने त्यांच्या निधनाचे वृत्त अनेकांसाठी वेदनादायी ठरले आहे.

या सोबतच आणखी एक धक्कादायक वार्ता समोर आली आहे. संगमनेर नगरपालिकेचे विद्यमान जनसेवक व एका महत्त्वाच्या खात्याचे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणावरुन एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोमवारी त्यांनी स्वतःची स्त्राव चाचणी करुन घेतली होती. त्याचा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त होऊन त्या पदाधिकार्याला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी त्यांच्या निकटवर्तीयांनी पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविले आहे. सदर पदाधिकार्याची शहरातील विविध गल्ली व चौकांत मित्रांची फौज आहे. दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत या सर्व कट्ट्यांवर हजेरी लावत असंख्य लोकांना भेटणे असा या पदाधिकार्याचा दिनक्रम होता. सदर पदाधिकार्याला कोविडचे संक्रमण कधी झाले व त्यानंतर ते किती जणांच्या संपर्कात आले यावर शहरातील मंदावलेल्या रुग्णसंख्येचे स्थैर्य अवलंबून आहे.

मंगळवारी रात्री शहरातील आठ जणांसह एकूण 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. गेल्या पाच दिवसांतील आजची रुग्णसंख्या दुसरी उच्चांकी ठरली आहे. यापूर्वी 3 जानेवारी रोजी 22 रुग्ण समोर आले होते. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील चैतन्यनगर परिसरातील 46 वर्षीय महिलेसह, 23 व 19 वर्षीय तरुण, मालदाड रोड परिसरातील 53 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, मेनरोड परिसरातील 55 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला व गणेशनगर परिसरातील 27 वर्षीय तरुण, त्यासोबतच शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील विठ्ठलनगर येथील 50 वर्षीय इसम, गोल्डनसिटी येथील 47 वर्षीय महिला, मेंढवण येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमज येथील 38 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 70 तर तळेगाव दिघ येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नान्नज दुमाला येथील 19 वर्षीय तरुणी, सुकेवाडी येथील 50 वर्षीय महिला, सोनेवाडी येथील 17 वर्षीय तरुण आणि मालुंजे येथील 38 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आज वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 6 हजार 69 वर पोहोचली आहे. तर आजच्या एका मृत्यूने मृतांची संख्या ही 48 वर नेली आहे. मात्र, सदरचा मृत्यू अद्याप शासकीय नोंदीत कोविड म्हणून गणला गेलेला नाही.

