आचार्यांचा वारसा जोपासताना ‘दर्पणा’चा वापर आवश्यक : श्याम तिवारी संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने आद्य मराठी संपादक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वृत्तपत्रांचा इतिहास जनतेचा आणि चळवळींचा इतिहास आहे. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याचे काम आजवरच्या वृत्तपत्रांच्या वाटचालीतून घडले आहे. त्या माध्यमातून जनतेला सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याचे शिक्षण मिळते. याच विचारातून एकोणावीस दशकांपूर्वी 6 जानेवारी, 1832 साली आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु करुन मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान प्राप्त केला.


पारतंत्र्यातील रयतेत राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्ज्वलित करण्यासाठी आचार्य जांभेकरांनी केलेल्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी साजरा होणारा मराठी पत्रकार दिन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी प्रेरणा दिनच असल्याचे दैनिक नायकचे कार्यकारी संपादक, संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी यांनी केले.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचचे उपाध्यक्ष नितीन ओझा, पत्रकार शेखर पानसरे, आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, नीलिमा घाडगे, अमोल मतकर, सतीश आहेर, अंकुश बुब, काशिनाथ गोसावी व भारत रेघाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, एकोणावीसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात मुद्रणालयाची सुरुवात झाली. त्याचा यथार्थ उपयोग करतांना आचार्य जांभेकर यांनी दर्पणची ज्योत सलग आठ वर्षे तेवत ठेवली. 25 जून, 1840 साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. इंग्रजी विद्येचे मराठी सार सांगणार्‍या दर्पणमधून शिक्षण आणि मनोरंजानाचा सुंदर समन्वय साधला गेला होता. लोकशिक्षण आणि लोकजागृती या हेतूने सुरु झालेल्या दर्पणमध्ये आठ वर्षांच्या काळात एकही जाहिरात छापली गेली नाही यावरुन त्यांचा हेतू सुस्पष्ट होतो. तत्कालीन गर्व्हनर जेम्स कार्नाक यांनी आचार्य जांभेकर यांच्या कार्याला आणि बुद्धिमत्तेला प्रभावित होवून त्यांना ‘जस्टीस ऑफ पीस’ हा खिताब देवून गौरविले होते.

6 जानेवारी, 1812 साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे जन्मलेल्या बाळशास्त्रींचे वडील गंगाधर शास्त्री पंडित तर आई धर्मपारायणवादी होती. 1824 साली जेव्हा ते मुंबईत आले तेव्हापासून त्यांनी इंग्रजीसह अन्य विदेशी भाषा आत्मसात करुन त्याचा समाजासाठी कसा वापर करता येईल याकडे त्यांचा ओढा होता. वयाच्या अवघ्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी पुढे आठ भाषांवर प्रभुत्त्व मिळविले होते. मराठीतील आद्य संपादक होण्याच्या बहुमानासह मुद्रणालयाची सुरुवात झालेल्या त्या काळात त्यांनी हस्तलिखितांमध्ये असणारी ज्ञानेश्वरी पहिल्यांदाच वाचकांना छापील स्वरुपात दिली. त्यासोबतच त्यांनी 1834 साली संपूर्ण भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा आणि 1845 साली शिक्षण संचालक होण्याचाही बहुमान प्राप्त केला होता.

अवघ्या चौतीस वर्षांच्या जीवनात आचार्य जांभेकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर खूप मोठे समाजासाठी, राष्ट्रासाठी आभाळाएवढे काम केले. या छोट्याशा जीवनप्रवासात भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, मानसशास्त्र या विषयावर त्यांनी ग्रंथ लिहीले. त्यासोबतच बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतिकथा याविषयावरही विस्तृत लिखाण केले. हिंदुस्तानचा प्राचिन इतिहास हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी सन 1851 साली प्रकाशित झाला. दादाभाई नौरोजी हे आचार्य जांभेकरांचे विद्यार्थी होते. आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारकासह ते भारतातील आद्य प्राध्यापकही होते. त्यांनी केलेले महान कार्य पुढील अनेक पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे ठरेल. अशा महान व्यक्तिचा वारसा जोपासताना आपण प्रत्येकाने सतत ‘दर्पणा’चा वापर केला पाहिजे असेही तिवारी यांनी आपल्या मनोगतात शेवटी सांगितले.

नितीन ओझा यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या साहित्य विषयक संपदेवर प्रकाश टाकतांना आजच्या माध्यमांचे बदललेले स्वरुप विशद् केले. आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, नीलिमा घाडगे, अमोल मतकर, भारत रेघाटे यांनीही शब्दरुपी आदरांजली वाहिली. काशिनाथ गोसावी यांनी आभार मानले.

Visits: 42 Today: 1 Total: 434361

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *