कोरोना संकटामुळे जेईई व नीट परीक्षा पुढे ढकला

कोरोना संकटामुळे जेईई व नीट परीक्षा पुढे ढकला
संगमनेर तालुका काँग्रेस समितीचे तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या देशात व राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी जेईई व नीट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने करण्यात आली आहे.


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर प्रांत कार्यालय येथे तहसीलदार अमोल निकम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, अ‍ॅड.त्र्यंबक गडाख, अ‍ॅड.अशोक हजारे, अ‍ॅड.नानासाहेब शिंदे, के.के.थोरात, जयराम ढेरंगे, सचिन खेमनर, सुरेश झावरे, बाजीराव शेरमाळे, शिवाजी गोसावी, तात्या कुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार आहे. जेईई परीक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या जेईई व नीट या परीक्षा 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. सदर निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visits: 73 Today: 1 Total: 1111887

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *