संगमनेर शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली! तिघांना अटक, दोघे पळून जाण्यात यशस्वी; नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार-पाच दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याची सूत्रे ‘पुन्हा’ हाती घेणार्‍या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या कर्तबागारीची झलक दाखवली आहे. बुधवारी (ता.6) मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाणे हद्दीतील संगमनेर-गुंजाळवाडी रस्त्याने गस्त करत असताना मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावत हॉटेल रानजाईजवळ दरोड्याच्या तयारीतील पाच जणांच्या टोळीतील तिघांना पथकाने मोठ्या शिताफीने पकडले तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन 8 लाख 80 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर-गुंजाळवाडी रस्त्यावरील हॉटेल रानजाईलगत असलेल्या पुणे-नाशिक बाह्यवळणखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेत पाच इसम पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसलेले आहेत. ते या रस्त्याने ये-जा करणार्‍यांना अडवून लुट करत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला वरील ठिकाणी पाचारण केले. त्यावेळी असीफ अन्सार पठाण (वय 31, रा.नाईकवाडपुरा), तन्वीर कादिर शेख (वय 36, रा.दिल्ली नाका), भूषण बंडू थोरात (रा.घुलेवाडी), अमोल जोंधळे (रा.गुंजाळवाडी) आणि बबलू उर्फ फिटर (रा.संगमनेर) हे पाच जण पांढर्‍या रंगाची क्रेटा कारच्या (क्र.एमएच.12, एमएफ.3684) आडोशाला दडून बसलेले होते.

पोलीस पथकाची चाहूल लागताच त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस शिपाई सचिन उगले, ज्ञानेश्वर सोनवणे, शरद पवार आणि महादेव हांडे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने पळून जाणार्‍या पाच जणांच्या टोळीतील असीफ पठाण, तन्वीर शेख व भूषण थोरात या तिघांच्या मुसक्या आवळल्या. तर अमोल जोंधळे व बबलू उर्फ फिटर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.


या प्रकरणी पोलीस शिपाई महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनं.13/2021 भादंवि कलम 399, 402 नुसार गुन्हा नोंदवला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी 8 लाख 50 हजार रुपयांची क्रेटा कार, 30 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल संच आणि 260 रुपये किंमतीचे स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, दोरी, मिरची पावडर आणि लोखंडी छन्नी असे दरोड्याचे साहित्य मिळून एकूण 8 लाख 80 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.

Visits: 273 Today: 2 Total: 1113560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *