कोरोनानंतर नागरिकांना महागाईच्या संकटाचा सामना करण्याची वेळ पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती सिलेंडरच्या किंमतीत झपाट्याने वाढ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोना महामारीच्या संकटातून सावरताना सर्वसामान्य नागरिकांना आता महागाईच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल आणि घरगुती सिलेंडरच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये इंधनच्या दरात सलग चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याने पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. सध्या श्रीरामपूर शहरात पॉवर पेट्रोल 94 रुपये 6 पैसे आणि साधे पेट्रोल 90 रुपये 64 पैसे तर डिझेल 79 रुपये 60 पैसे असे दर आहेत. तर खाद्यतेलाचे दर मागील दहा दिवसांमध्ये सरासरी पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड होत आहे.

विशेष म्हणजे आणखी दरवाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे प्रदेश, व्यापार आणि व्यवहार विस्कळीत झाल्याने तेलाची आयात प्रक्रिया ठप्प झाली. तसेच स्थानिक खाद्यतेल उत्पादन मंदावले आणि खप वाढल्याने खाद्यतेलाचे दरही झपाट्याने वाढले. दिवाळीनंतर गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली. बदलत्या जीवनशैलीमुळे पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल आणि गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजा बनल्या आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. परिणामी, आर्थिक अडचणींवर मात करताना महागाईचा भडका सातत्याने वाढत आहे. यामुळे वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. वर्षभरात इंधनाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने लॉकडाऊनंतर मालवाहतुकीत सरासरी 30 टक्के भाडेवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.

घरगुती गॅस सिलेंडरसह खाद्यतेलाचे दर कडाडल्याने आर्थिक भार सहन करण्याची वेळ निर्माण झाल्याचे गृहिणी सांगतात. सण-उत्सव समारंभ आणि विविध सोहळ्यासाठी खाद्यतेलाची मोठी मागणी असते. सध्या तेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विविध खाद्यपदार्थाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर महागड्या दरात इंधन खरेदी करण्याची वेळ ओढावली आहे. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरसाठी केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आज 703 रुपये 50 पैसे जमा करून गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत आहे. नोव्हेंबरमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात दोन टप्प्यात 50 रुपये अधिक 50 रुपये अशी सलग दरवाढ झाली. त्यामुळे 603 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर 703 रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 117209

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *