मुळा धरणात एकजण बुडाला; शोध सुरू

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणारे चारजण स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुळा धरणावर गेले. पण हाच आनंद फार काळ टिकला नाही. कारण 3 मित्रांनी आपल्या एका मित्राला गमावले आहे.

रविवारी (ता. 15) ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मुळा धरणावर मोठी गर्दी केली. त्यात, राहुरी शहरातील वैशाली हॉटेलमध्ये काम करणारे चारजण धरणाच्या चमेली अतिथीगृहाच्या जवळ बसले. पैकी, बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) व रावसाहेब भिमराज मते (वय 40, रा. मुलनमाथा, राहुरी) दुपारी एक वाजता अतिथीगृहाच्या मागील बाजूने धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु अथांग खोल पाण्यात दमछाक झाल्याने त्यांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. धरणात मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे मदतीला धावले. त्यांनी रावतला बुडताना वाचविले. तोपर्यंत मते पाण्यात गायब झाले होते. काठावर उभे राहून दुर्घटना पाहणार्या त्यांच्या दोन सहकार्यांनी घाबरुन धूम ठोकली. घटनास्थळी शेकडो पर्यटक बघ्यांची गर्दी जमली. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच दुपारी तीन वाजता पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, कर्मचारी अण्णासाहेब चव्हाण, संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले. धरणात मासेमारी करणारे लहू बर्डे, अशोक गायकवाड, किशोर बर्डे, विकास गंगे, इंद्रजीत गंगे, चंदू बर्डे, शक्तीलाल गंगे, करण सूर्यवंशी यांच्या मदतीने होडीतून व ट्युबच्या सहाय्याने पाण्यात गळ टाकून शोध घेण्यात आला. अंधार पडल्यावर शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी (ता. 16) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.

मुळा धरणाच्या चमेली अतिथीगृहाकडे पर्यटक जाऊ नयेत. यासाठी खंदक करून वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, पर्यटकांनी खंदक बुजवून पुन्हा रस्ता केला. तेथे फलक लावून पर्यटकांनी पाण्यात उतरु नये. यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. तरी, पर्यटक दुर्लक्ष करुन जीवाची बाजी लावतात. त्यामुळे दुर्घटना घडतात.
– अण्णासाहेब आंधळे (मुळा धरण शाखाधिकारी)
