धक्कादायक! चक्क कारागृहातूनच नवकैद्यांच्या घरी खंडणीचे ‘कॉल’! संगमनेरची तुरुंग व्यवस्था चव्हाट्यावर; ‘बापाची ‘नर्मदा’ वारी अन् पोरगं वेश्येच्या दारी..!’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कैद्यांसह कारागृहातच वाढदिवसाचा जल्लोष, विनासायस कोठडीत पोहोचणार्या चैनीच्या वस्तू आणि खाद्यान्न, गज कापण्यासाठी हेक्सा ब्लेड आणि बाह्य जगाशी संपर्कासाठी मोबाईल फोनची सुविधा सहज उपलब्ध होणार्या संगमनेरच्या उपकारागृहातून पुन्हा एकदा धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यावेळी पूर्वीच्या कारनाम्यांचे सर्व विक्रम मोडीत काढताना महिनोन् महिने कारागृहात खितपत पडलेल्या सराईत कैद्यांनी नव्याने कोठडीत दाखल झालेल्या आरोपींना मारहाण करीत मोबाईलद्वारे त्यांच्या कुटुंबियांकडून चक्क ‘खंडणी’ मागितली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने संगमनेरच्या ढासळलेल्या तुरुंग व्यवस्थेचे वास्तव चव्हाट्यावर आणले असून कारागृहातील कैद्यांना कोणाचाही ‘धाक’ नसल्याचेही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच या उपकारागृहातून चार कैद्यांनी नियोजनबद्ध पलायन केले होते, मात्र त्यातून कोणतीही शिकवण घेतली गेली नसल्याचे वास्तवही या घटनेने उघड केले आहे.
मंगळवारी (ता.६) रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी घारगाव पोलिसांना पठारभागातील पोखरी बाळेश्वर परिसरात छापा घालून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार घारगावचे निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे, पल्लवी वाघ, हवालदार अनिल कडलग, (चालक) संतोष फड, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, राहुल सारबंदे, (चालक) नामदेव बिरे व महिला कॉन्स्टेबल ताई शिंदे यांच्या पथकाने कुंटणखान्याची मालकीण वैशाली उत्तम फटांगरे हिच्या पत्र्याच्या शेडवर छापा घातला.
‘अंटी’ वैशाली फटांगरे (वय ४८, रा.पोखरी बाळेश्वर) हिच्यासह हा कुंटणखाना चालवणार्या सोमनाथ यादव सरोदे (रा.आनंदवाडी) (पसार), दीपक उत्तम फटांगरे (वय २१, रा. पोखरी बाळेश्वर) या तिघांसह वेश्यागमनासाठी गेलेल्या अकोल्यातील एकासह नांदूर खंदरमाळ व निमज येथील तिघा ग्राहकांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांना बुधवारी (ता.८) न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.१२) पोलीस कोठडीत पाठवले. संगमनेरच्या उपकारागृहात एकूण चार बराकी असून त्यातील एक महिलांसाठी असून त्यात चार कैदी आहेत. उर्वरीत तीन कोठड्यांमध्ये सरासरी २० कैद्यांप्रमाणे एकूण ५८ कच्चे कैदी आहेत. घारगाव पोलिसांच्या कारवाईत एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना सायंकाळी वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये टाकण्यात आले.
सद्यस्थितीत संगमनेरच्या उपकारागृहात महिला कोठडीत पाच महिला कैद्यांसह संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२ तर तुरुंगाचे नूतनीकरण सुरु असल्याने शिर्डी-कोपरगावचे ३१ आरोपी कैद आहेत. घारगाव पोलिसांनी पहिल्यांदाच कुंटणखान्याच्या मालकीणीसह तिला सहाय्य करणारे व ग्राहक अशा सर्वांनाच कारागृहात टाकले. त्या सर्वांसाठी कोठडीचा अनुभव नवा असल्याने रात्र होताच ‘न्यायालयीन’ कोठडीतील अन्य सराईत कैद्यांनी ग्राहक म्हणून ‘पोलीस’ कोठडीत मात्र, एकाच बराकीत आलेल्या एका आरोपीला दमात घ्यायला सुरुवात केली, त्यामुळे तो घाबरला.
कोठडीतील सराईतांपैकी एकाने मोबाईल हातात घेत वेश्यागमनाच्या प्रकरणात कोठडीत आलेल्या आरोपीला कुटुंबातील एकाचा मोबाईल क्रमांक देण्यास भाग पाडले. सदरील आरोपी आधीच घाबरलेला असल्याने त्याने लागलीच त्याला आपल्या मावसभावाचा क्रमांक दिला. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला शोभेल अशा या घटनेत सदरच्या कैद्याने थेट मिळालेल्या क्रमांकावर फोन करुन ‘ऑनलाईन’ पैसे टाकण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कोठडीत असलेल्या त्याच्या भावाचा ‘कार्यक्रम’ करण्याची धमकीही दिली गेली. या संपूर्ण प्रकाराने कोठडीतील ‘त्या’ आरोपीसह त्याचे कुटुंबियही दहशतीत आले आहे. याबाबतच पोलिसांकडून काय कारवाई झाली याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र या धक्कादायक प्रकाराने संगमनेरच्या उपकारागृहातील अनागोंदी पुन्हा एकदा उजेडात आणली असून कोठडीतील कैद्यांना पाहिजे त्या गोष्टी विनासायस उपलब्ध होत असल्याचेही उघड झाले आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी याच कारागृहातून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार व पोक्सोसारख्या प्रकरणातील चार आरोपी कोठडीचे गज कापून पसार झाले होते. त्यावेळच्या चौकशीत आरोपींकडे कोठडीत मोबाईल होता व त्याचा वापर करुनच त्यांनी तुरुंग फोडून पलायनाची योजना आखल्याचे समोर आले होते. ज्यावेळी ‘ते’ आरोपी पळाले तेव्हा पोलीस ठाण्यापासून शंभर पावलांवरच त्यांच्यासाठी अलिशान चारचाकी उभी होती असेही तपासातून समोर आले होते. या घटनेनंतर वरिष्ठांची चिडचीड झाल्याने संपूर्ण कारागृहाच्या झाडाझडतीचेही प्रयोग झाले. मात्र त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत पुन्हा एकदा संगमनेरचा उपकारागृह चर्चेत आला असून त्यातून संगमनेर पोलिसांचा ‘वचक’ही अधिक ठळक झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला या गंभीर घटनेकडे किती गांभीर्याने बघतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘बापाची ‘नर्मदा’ वारी अन् पोरगं वेश्येच्या दारी..!’
कारागृहातून कोठडीत कैद असलेल्या बंदीवानाकडून फोनद्वारे खंडणीची धमकी देणारा हा प्रकार खूप गंभीर आहे. यापूर्वी जिल्ह्यात कधीही न घडलेल्या अशा घटनेने पोलिसांच्या कारागृह व्यवस्थेची लक्तरे उधडली आहेत. बुधवारी रात्री सराईत कैद्यांनी मस्तीच्या धुंदीत सापडून कारागृहात अडकलेल्या ज्या आरोपीला दमबाजी करुन त्याच्या कुटुंबाकडून ‘खंडणी’ची मागणी केली, त्या तरुणाचे वडील भारतीय संस्कृतीत अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या ‘नर्मदा’ परिक्रमेसाठी गेले आहेत. जन्मदाता जीवनाचे सार्थक संकलित करीत असताना त्यांचा सुपुत्र मात्र वेश्यागमनाच्या कारवाईत सापडला आणि सराईतांच्या धमक्यांचा बळी ठरला आहे. हा प्रकार म्हणजे ‘बापाची ‘नर्मदा’ वारी अन् पोरगं वेश्येच्या दारी..!’ असाच म्हणावा लागेल.