कोपरगाव शहरात जनता संचारबंदी लागू करणे आवश्यक!
कोपरगाव शहरात जनता संचारबंदी लागू करणे आवश्यक!
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत नगराध्यक्ष वहाडणेंनी मांडली भूमिका
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सामान्य जनतेत मोठी घबराट उडालेली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात जनता संचारबंदी अंमलात आणणे गरजेचे होऊन बसले असल्याचे नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या भावना जनसामान्यांसमोर व्यक्त करताना नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, राज्यात दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहे. त्यामुळे अनेक परिवार उघड्यावर पडले आहेत. अशीच परिस्थिती कोपरगाव शहराची मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे झाली आहे. यामुळे जनता सैरभैर झालेली आहे. सामान्य जनतेत पुन्हा काही दिवसांकरिता कोरोना साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाऊन’ करावे अशी कुजबुज चालू आहे. परंतु शासन-प्रशासनाची भूमिका पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याची नाही. त्यामुळे धोकाही अधिक वाढलेला आहे हे शंभर टक्के सत्य आहे. पुन्हा जनता संचारबंदी लागू करावी कि नाही यासाठी मी विचारविनिमय करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पालिका कार्यालयात व्यापक बैठक घेतली होती. शहराचा प्रथम नागरिक म्हणून अशा संकटात सर्वांशी चर्चा करावी हा एकमेव हेतू होता. कुठलाही निर्णय सहमतीने व्हावा असे मला नेहमीच वाटते. एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. त्या बैठकीत शहरातील डॉक्टर, व्यापारी, सामान्य नागरिक उपस्थित होते. त्यापैकी काहींनी जनता संचारबंदी करावी असे मत मांडले; तर अनेकांनी आर्थिक अडचणी वाढतात म्हणून संचारबंदी सध्या नको असे विचार मांडले. पण आता संपूर्ण कोपरगाव शहरच कोरोनाग्रस्त होते कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
छोट्या-मोठ्या व्यावसायिक, व्यापार्यांत घबराट उडालेली आहे. ज्या कुटुंबात रुग्ण असतात त्यांची मानसिक व आर्थिक ओढाताण फारच भयानक आहे. गरिबांनी उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हाही प्रश्नच आहे. कोणत्याही नागरिकांचा कोरोनामुळे अकाली बळी जाऊ नये, कोणाचेच कुटुंब उघड्यावर येऊ नये यासाठी खरे तर आता जनता संचारबंदीची गरज आहे असे मला तरी वाटते. पण काहींना माझे म्हणणे मान्य नसेल तर माझा कुठलाच आग्रह नाही. सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत. निदान या परिस्थितीत तरी एकमेकांवर टीका टिप्पणी करून कुणीही वातावरण दूषित करणे योग्य होणार नाही. अहमदनगरमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला दोन-दोन दिवस नंबर लागत नाही. आपल्या कोपरगाववर अशी परिस्थिती येऊ नये इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. ज्या कुटुंबातील काही बळी गेले, जे कोविडग्रस्त रुग्णालयात आहेत त्यांच्या मनःस्थितीचा व शहरावर आलेल्या या भीषण परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करावा हिच अपेक्षा आहे. या विषयावर कुणी माझ्यावर टीका केली तरी हरकत नाही. कारण कुणाचा अकाली बळी जाऊ नये हिच इच्छा आहे, अशी भावना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मांडली आहे.