शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेच लढविणार लोकसभा निवडणूक? वरिष्ठांकडून कामाला लागण्याच्या सूचना आल्याचा केला दावा


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप यांच्याकडून विविध मार्गाने दबाव आणला जात असताना आता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उघडपणे मैदानात उतरले आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून, वरिष्ठांकडून कामाला लागण्याच्या सूचना आल्याचे वाकचौरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

वाकचौरे यांचा केवळ पक्षप्रवेश झाला असून, कोणालाच उमेदवारी नक्की नाही, असे सांगण्यात आले होते. आता वाकचौरे यांनी प्रथमच उमेदवारीवर दावा केला. ते म्हणाले, की आपण स्थानिक आहोत. सर्व जातीधर्मांचे मतदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळेच २००९ मध्ये रामदास आठवले यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून आपण विजयी झालो होतो. म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पुन्हा पक्षात घेऊन तयारीलाही लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण कामाला सुरुवात केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. त्यातील दक्षिणेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडे आहे, तर शिर्डीची शिवसेनेकडे. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) गटाने आढावा घेताना नगर दक्षिणमधूनही माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव पुढे आणले होते. जागा वाटपाआधीच शिवसेनेने हे पाऊल उचलले. त्यामुळे आता शिर्डीत वाद निर्माण झाल्यावर घोलप यांनी शरद पवार आणि आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे नेमके कोण कोणावर राजकीय कुरघोडी करीत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना (ठाकरे) गट अडचणीत असताना घोलप स्वत: होऊन पुढे आले. त्यावेळी सुरुवातीला आदित्य ठाकरे आणि नंतर अन्य नेत्यांनी त्यांच्या शिर्डीतून उमेदवारीचे संकेत दिले. मात्र, मधल्या काळात राजकारण बदलत गेले. स्थानिक काही कार्यकर्त्यांकडून घोलप यांना विरोध सुरू झाला. अर्थात, तसाच विरोध नंतर वाकचौरे यांनाही झाला. तरीही पक्षातून घोलप यांना स्पष्टपणे का सांगितले जात नाही? त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेले असताना वाकचौरे यांचा पक्षप्रवेश का व कोणी घडवून आणला? घोलप यांना टाळण्यामागे त्यांच्या अपात्रतेचे तांत्रिक कारण आहे की राजकीय? असे सवाल उपस्थित होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे घोलप यांचे मंत्रिपद गेले होते, पुढे त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले होते.

Visits: 36 Today: 1 Total: 118450

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *