प्राथमिक शिक्षकाला सलग दुसर्‍या वर्षी मायक्रोसॉफ्टचा बहुमान

प्राथमिक शिक्षकाला सलग दुसर्‍या वर्षी मायक्रोसॉफ्टचा बहुमान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक शिवनाथ भुजबळ यांचा खेडपाड्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान विषयक केलेल्या कामासाठी मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीने सलग दुसर्‍या वर्षी मायक्रोसॉफ्ट ‘इनोव्हेटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ म्हणून सन्मान केला आहे.


खेड्यापाड्यातील सरकारी शाळा अनेक समस्यांनी ग्रस्त असताना प्राथमिक शिक्षक शिवनाथ भुजबळ यांनी शाळा हेच विकासाचे माध्यम मानत शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांना एकत्र आणण्यात तंत्रज्ञानाचा अफलातून वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजक व प्रभावी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोविड-19 मुळे शाळा मार्च 2019 पासून बंद आहेत, असे असले तरी विद्यार्थी शिकला पाहिजे या प्रबळ इच्छेतून त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. पण हे तंत्रज्ञान फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अंमलात न आणता ‘हे विश्वची माझे घर’ ही भावना मनात ठेवत राज्यातील तंत्रज्ञानात उत्कृष्ट काम करणार्‍या 13 शिक्षकांना एकत्र आणत देशातील बहुचर्चित ‘बॅटल वर्सेस कोरोना’ हा प्रोजेक्ट साकारला. प्रथम टप्प्यात या 13 शिक्षकांना एकत्र आणत तंत्रज्ञानविषयक प्रोजेक्टच्या दृष्टीने प्रशिक्षण देऊन प्रोजेक्टची कार्यप्रणाली ठरविली. सदर प्रोजेक्ट 5 एप्रिल ते 5 जून, 2020 या कालावधीत पार पडला. राज्यभरातील विविध शाळांमध्ये एकत्रितपणे तब्बल 200 पेक्षा अधिक सेशन घेत यामध्ये 5000 लाभार्थ्यांना याचा लाभ या दिवसांत घेता आला.


या उपक्रमात शिक्षक भुजबळ यांनी मायक्रोसॉफ्ट टीम्स, स्काईप, मायक्रोसॉफ्ट फॉर्म, वेकलेट, फ्लिपग्रीड, काहूत, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट, मायक्रोसॉफ्ट व्हाईटबोर्ड या तंत्रज्ञानाचा एकत्रितरित्या प्रभावी वापर करून अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अधिक रंजकपणे साकार केली. याशिवाय स्काईप तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, वाहतूक व रस्ते सुरक्षा, बॅटल वर्सेस कोरोना, जागतिक स्थैर्य व विकासाची लक्ष्ये-2030 या घटकांवर जगभरात 3,97,972 स्काईप मैल प्रवास करत 16 देशांमधील हजारो विद्यार्थ्यांना अध्यापन केले. भुजबळ यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 118381

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *