हरिश्चंद्र गडावरील पुरातन मंदिराची जीर्णावस्थेकडे वाटचाल…! पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष; तर पर्यटकांकडून अस्वच्छतेत भर

नायक वृत्तसेवा, अकोले
हरिश्चंद्र गड मंदिराकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे त्याचे अस्तित्व संपुष्टात तर येणार नाही ना? अशी शंका या भागातील आदिवासींच्या मनात घर करु लागली आहे. वर्षानुवर्षे या मंदिराचा ढाच्या व दगडी काम सरकू लागले आहे. या मंदिराच्या दगडाला देखील हात लावल्यास त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व खाते संबंधित व्यक्ती अगर संस्थेवर दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचनांचे फलक मंदिराच्या दर्शनी भागावर लावण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना उघड्या डोळ्यांनी या मंदिराची जीर्णावस्था पाहण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

सध्या हरिश्चंद्र गडावर एक मजूर ठेवण्यात आला आहे. तो सातत्याने दगड सरकला, मूर्ती चोरीला गेली की पाचनई ग्रामस्थांचे पत्र घेऊन अहमदनगरला जाणार व पुरातत्व खात्याला निरोप पोहच करतो. मात्र, हा विभाग या बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही. गेल्या महिन्यात या मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी मूर्ती चोरीस गेल्या आहेत. त्या भग्न अवस्थेत सापडल्या आहे. मात्र त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने या मूर्ती सध्या पोलीस पाटील बारकु भारमल यांच्या घरी ठेवण्यात आल्या आहेत. तर मंदिराच्या शेजारी असलेल्या पुष्करणी जवळील देव-देवतांच्या 15 मूर्ती एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आल्या असून त्यावर मोठी धूळ बसली आहे.

मुख्य मंदिराच्या गाभार्यात उभ्या असलेल्या दगडी शिळा भंग पावलेल्या आहेत. ऊन, पाऊस अधिक असल्याने चिरा पडल्या आहेत. आजूबाजूला दगड नुसतेच पडून आहेत. पिंडी, नंदी यांचे अर्धे भाग तुटले आहेत. तर दगडांना शेवाळ बसलेला असून मंदिराच्या गाभार्यात पाणी गळती सुरू आहे. पुष्करणीमधील पाणी खराब झाले आहे. आजूबाजूला प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असून स्वच्छतेचा अभाव सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थ मंदिरात पूजा-अर्चा करतात. तिथे स्वच्छता गृह नाही. त्यात मुक्कामाला असणारे पर्यटक घाण करतात. त्यामुळे गुहेच्या बाजूला दुर्गंधी येते. तर काहीजण निर्बंध असून धूम्रपान, मद्यपान करताना दिसतात. त्यामुळे परिसरात बाटल्या पडलेल्या दिसतात.

दरम्यान, 31 डिसेंबरला गडावर बंदी असल्याने पर्यटक त्यापूर्वीच गर्दी करू लागले आहे. कळसूबाईप्रमाणे गडावर वीजेची व्यवस्था किंवा सोलर प्रकल्प लावून वीज द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तर गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने वन विभागाने रस्ता तयार करावा, राजूर ते पाचनई रस्ता लोकप्रतिनिधींनी करण्याची मागणी होती. आता माजी आमदारांच्या निधीतून केळी ओतूर ते पेठ्याचीवाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने मंदिराच्या सद्यपरिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे सुरेश भांगरे, चंदर भारमल व पाचनई ग्रामस्थांनी केली आहे.

