घारगावच्या जळीतग्रस्त शिंदे कुटुंबाला मदतीचा ‘आधार’! मदतीचे साहित्य पाहून कुटुंबियांचे डोळे पाणावले…
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील प्रभाकर शिंदे यांच्या घरात चार दिवसांपूर्वी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर पै-पै करून शोकेसमध्ये साठवलेले पैसेही या आगीतून सुटले नाहीत. या धक्क्याने शिंदे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले होते. दरम्यान, गोरगरीब कुटुंबांना व अनाथ मुलांना कायमच मायेचा ‘आधार’ देणार्या संगमनेर येथील आधार फाऊंडेशनने नुकतेच जळीतग्रस्त शिंदे कुटुंबाला भांडी, कपडे, धान्य आदी साहित्य देवून आधार दिला आहे.
चार दिवसांपूर्वी घरात शॉर्टसर्किट होवून संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, पैसे, टीव्ही आदी जळून खाक झाले होते. त्यामुळे शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले होते. याबाबत माध्यमांनी दखल घेऊन मदतीसाठी दानशूरांना आवाहन केले होते. याची दखल घेत संगमनेर येथील ‘आधार’ फाऊंडेशनच्या सदस्यांनी नेहमीप्रमाणे मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (ता.30) सायंकाळी फाऊंडेशनचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे, समर्थ फर्निचरचे संचालक वाल्मिक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, सोमनाथ मदने, सुखदेव इल्हे, संतोष टावरे, सुनंदा भागवत, कवीता टावरे, धनंजय आहेर, लक्ष्मण कोते, नारायण भागवत, मुजावर आदिंनी घारगाव येथे येवून शिंदे कुटुंबाला ही मदत सुपूर्द केली आहे.
याप्रसंगी सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने यांनी आधार फाऊंडेशनचे कार्य समजावून सांगताना म्हणाले, अनाथ मुलांसाठी आधार फाऊंडेशन वर्षांनुवर्षांपासून काम करत आहे. या माध्यमातून अनेक अनाथ मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. गरिबीतून वर आलेली मुले उच्च पदावर जात आहे. आजपर्यंत 165 मुलांना ‘आधार’ देण्याचे काम केले आहे. सुनंदा भागवत म्हणाल्या, आधार फाऊंडेशनचे काम खरोखर कौतुकास्पद आहे. तळागाळातील गरीब कुटुंबाला आज आधार देण्याचे पवित्र काम केले आहे. डॉ.महादेव अरगडे म्हणाले, आधार फाऊंडेशन नेहमीच गोरगरीब कुटुंबांना मदत करत आले आहे. यावेळी वाल्मिक चौधरी, किशोर डोके, संतोष टावरे यांनीही आधार फाऊंडेशनचे कार्य विशद केले.