छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना! राहुरीत मोठा तणाव; संतप्त नागरिकांनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग रोखला..

नायक वृत्तसेवा, राहुरी 
सोलापूरकर, कोरटकर आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरात घडलेल्या हिंसाचाराची घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत आज दुपारच्या वेळी राहुरीतील कोळीवाडा परिसरात असलेल्या बुवासिंदबाबा समाधी परिसरात असलेल्या तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करीत शिवप्रेमींना डिवचण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी अहिल्यानगर-मनमाड महामार्ग तब्बल तीनतास रोखून धरला होता. तर, राहुरीकरांनीही उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवला. सद्यस्थितीत राहुरी शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीत भेट दिली असून लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. तर, येत्या दोन दिवसांत त्याच परिसरात दुसरा पुतळा उभारणार असल्याची घोषणा आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात बुवासिंदबाबा यांची समाधी असून तेथे सर्वधर्मीय भाविकांची वर्दळ असते. या समाधीच्या शेजारीच जुनी तालीम असून त्यात बजरंगबलींसह छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळाही आहे. परिसरातील तरुण दररोज या तालमीत नियमितपणे व्यायामालाही जातात. आज (ता.26) दुपारीही दोन ते अडीचच्या सुमारास काही तरुण तालमीत गेले असता छत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याची बाब समोर आली. ही घटना काही क्षणातच वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण शहरात पसरल्याने तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे तालमीच्या परिसरात जमा होऊन जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे परिसरातील वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला. 
सदरचा प्रकार शहरातील व्यापारीपेठेतही पोहोचल्यानंतर राहुरीकरांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. हा प्रकार समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व राहुरी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहनही केले. मात्र जमलेल्या शेकडो तरुणांनी तेथून घोषणाबाजी करीत थेट अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर येऊन वाहतूक रोखली. तब्बल तीनतास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरुन होणारी वाहतूक दीर्घकाळ खोळंबून वाहनांच्या अनेक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. 
ही घटना समजतात राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेवून संतप्त शिवप्रेमींची भेट घेतली व घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी पोलिसांना तातडीने सखोल तपास करुन दोषी असलेल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेनंतर राहुरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलताना लवकरात लवकर प्रकरणाचा तपास करुन आरोपींना गजाआड करण्याची ग्वाही दिली आहे. स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनीही दोन दिवसांत आरोपी अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा देत दोन दिवसांत विटंबना झालेल्या ठिकाणीच छत्रपतींचा नवीन पुतळा उभारण्याची घोषणाही केली. सध्या राहुरीत तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Visits: 57 Today: 1 Total: 403699

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *