प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर महिलेने उपोषण सोडले 15 फेब्रुवारीपर्यंत गटविकास अधिकार्यांच्या दालनात होणार सुनावणी

नायक वृत्तसेवा, अकोले
प्रजासत्ताक दिनी अकोले पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ निंब्रळ येथील नीलम अभिजीत डावरे या महिलेने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीला घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर दुसर्या दिवशी शुक्रवारी (ता.27) सायंकाळच्या सुमारास प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.

निंब्रळ गावातील मिळकत क्रमांक 778 चे पक्के घर अभिजीत सजन डावरे व नीलम अभिजीत डावरे यांच्या नावे होते. मात्र, अभिजीत सजन डावरे, सेवानिवृत्त पोलीस सजन कारभारी डावरे व मंदा सजन डावरे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून माझी कोणतीही संमती न घेता संबंधित घर सजन डावरे व मंदा डावरे यांच्या नावावर करून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करत महिलेने उपोषण सुरू केले होते. त्यामुळे हे घर पुन्हा माझ्या नावावर व्हावे, या मागणीसाठी ही महिला आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन आमरण उपोषणास बसली होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेऊन 15 फेब्रुवारी, 2023 पर्यंत गटविकास अधिकार्यांच्या दालनात सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगून त्यावरुन नियमोचित आदेश देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.

दरम्यान, मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुर्हाडे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड व सुभाष सूर्यवंशी यांनीही भेट घेत चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी उपोषणाला बसलेल्या महिलेची दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी के. डी. सरोदे, ग्रामविकास अधिकारी संतोष गोडे, मच्छिंद्र साबळे, गणोरेचे सरपंच संतोष आंबरे, कुंडलिक मंडलिक, राजेंद्र देशमुख, मीनल देशमुख, पुष्पा नाईकवाडी, भगवान करवर, गोरक्ष हासे, मंदा साळुंके, मंगल मालुंजकर, सुमिरण मालुंजकर आदी उपस्थित होते.
