संगमनेर पोलिसांच्या मदतीने राजूर पोलिसांनी पकडले चार कुख्यात गंठणचोर! राजूरहून संगमनेरकडे येणार्‍या चौघांनाही संगमनेर वाहतुक शाखेच्या जिगरबाज पोलिसांनी केले होते चतुर्भूज..

नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्ह्यातील विविध ठिकाणी धुमाकूळ घालणार्‍या श्रीरामपूरातील चौघा गंठणचोरांना संगमनेर पोलिसांच्या मदतीने राजूर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 96 हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात गंठणचोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र त्यातील अपवादात्मक गुन्ह्यांचे तपास लावण्यातच पोलिसांना यश आल्याने राजूरी पोलिसांची कारवाई पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावणारी ठरणार आहे.


याबाबत दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी (ता.26) राजूर येथील कुसुम प्रभाकर नाडेकर या राजूर बसस्थानकातून सुटणार्‍या राजूर – कोहणे या बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी आपला डाव साधला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी या महिलेच्या गळ्यातील 16 ग्रॅम 960 मिली वजनाचे आणि सुमारे 96 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण ओरबाडून पोबारा केला. आपल्या गळ्यातील गंठण चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच त्या महिलेने आरडाओरड केली. याबाबत राजूर पोलिसांनाही कळविण्यात आले.


राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बसस्थानकावरील सीसीटीव्हीचा आधार घेत संशयीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता चार संशयीत संगमनेरच्या दिशेने निघालेल्या संगमनेर आगाराच्याच (एम.एच.14/बी.बी.टी.1147) या बसमधून पळून जात असल्याचा त्यांना संशय आला. त्यानुसार त्यांनी राजूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खैरनार, पो.हे.कॉ.आघाव, पो.कॉ.फटांगरे, गाढे, महिला पोलीस कर्मचारी वाडेकर, अकोले पोलीस ठाण्याचे कर्मचारी मैड आदींनी खासगी वाहनातून त्या बसचा पाठलाग सुरु केला. मात्र राजूर बसस्थानकातून सदरची बस निघून बराच वेळ झालेला असल्याने सदरची बस कर्मचार्‍यांच्या हाती लागणार नाही असा कयास लावून सहाय्यक निरीक्षक पाटील यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना याबाबतची माहिती दिली.


पोलीस उपअधीक्षक मदने यांनी संगमनेरच्या वाहतुक शाखेचे सहाय्यक फौजदार विजय परदेशी, प्रभाकर भगत, सरोदे व शहर पोलीस ठाण्याचे पो.ना.विजय खाडे यांना याबाबतची माहिती देत नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानुसार या कर्मचार्‍यांनी हॉटेल राज पॅलेस, अकोले नाका येथे नाकाबंदी केली. त्या दरम्यान पोलीस उपअधीक्षक मदने यांनी राजूर पोलिसांकडून प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज व त्या बसचा क्रमांकही कळविला. काही वेळातच राजूरहून सुटलेली ती बस अकोले नाक्यावर आली. संगमनेर पोलिसांनी त्या बसला थांबण्याचा इशारा करीत लागलीच त्यात प्रवेश केला आणि मिळालेल्या वर्णनानुसार बसमध्ये दबा धरुन बसलेल्या त्या चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे काहीवेळ बसमध्ये गोंधळही निर्माण झाला होता. मात्र चोरटे पकडले गेल्याची माहिती प्रवाशांना समजताच बसमधील प्रवाशांनी टाळ्या वाजवून संगमनेर पोलिसांचे कौतुक केले.


सदरील चौघांना बसखाली उतरवून बस सोडून देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच राजूर पोलिसांचे पथकही अकोले नाक्यावर पोहोचले आणि त्यांनी संगमनेर पोलिसांनी जेरबंद केलेल्या त्या चौघांना सोबत घेत पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला. सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी त्या चौघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साहिल नसिर खान (वय 21, रा.वॉर्ड नं.3), अर्जुन कानिफनाथ भोसले (वय 21), कमलेश उत्तम पवार (वय 21) व गुफरान निसार पठाण (वय 21, तिघेही रा.वॉर्ड क्र.2, श्रीरामपूर) असल्याचे सांगीतले. त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच राजूर बसस्थानकात चोरलेले गंठण त्यांनी काढून दिले. त्याशिवाय अन्य एका गुन्ह्याचीही कबुली दिली.


राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अत्यंत वेगाने तपासाची सूत्रे हलवतांना राजूर पोलिसांना पाठलागावर पाठवित अकोले व संगमनेर पोलिसांना सदरच्या बसबाबत माहिती देत ती रोखण्यास व त्यातील आरोपी ताब्यात घेण्यास सांगीतले. या दरम्यान त्यांनी तीनही ठिकाणच्या पोलीस कर्मचार्‍यांसोबत उत्तम समन्वय साधीत संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचेही मार्गदर्शन मिळविले. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोनच तासांत मुद्देमालासह चारही आरोपी चतुर्भूज करण्यात राजूर पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांनी या तिनही ठिकाणच्या पोलिसांचे कौतुक केले आहे.

Visits: 220 Today: 1 Total: 1577289

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *