साईबाबांच्या काकड आरतीसाठी 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी? दिल्लीतील भाविक महिलांचा आरोप; तक्रार आल्यास चौकशी करण्याचे संस्थानचे स्पष्टीकरण

नायक वृत्तसेवा, शिर्डी
ख्रिसमस, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधून साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. परंतु, यातच काही भाविकांना विचित्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील काही महिला भाविकांकडे साईंच्या दरबारी काकड आरतीसाठी उपस्थिती लावण्यासाठी मंदिराकडून 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याची धक्कादायक बाब रविवारी (ता.27) संध्याकाळी उजेडात आली आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रासह परराज्य आणि परदेशातूनही असंख्य भाविकांची रीघ शिर्डीतील साईमंदिरात सुरुच असते. मागील काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा कालावधी वगळला तर, वर्षाचे बाराही महिने इथे कमालीची गर्दी पहायला मिळते. सध्याही टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर मंदिरे पुन्हा उघडण्याची परवानगी शासनाने दिली आणि अनेकांचे पाय शिर्डीकडे वळले. त्यातच ख्रिसमस, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधून साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. या दरम्यानच, साईबाबांच्या काकड आरतीसाठी तब्बल 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप दिल्लीतील काही महिला भााविकांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेर्यासमोर बोलण्यास नकार दिला. पण, अशा तक्रारी आल्या असल्यास आम्ही त्याची चौकशी करु असं स्पष्टीकरण दिलं आहे.

जो भक्त देणगी देतो त्या भक्ताला मंदिर संस्थानच्यावतीने दर्शन आणि आरतीची व्यवस्था केली जाते. हा बर्याच वर्षांपूर्वीपासूनचा निर्णय आहे. पण, पैसे दिल्यानंतर आरतीचा पास मिळेल अशी कोणतीही मागणी कधी करण्यात आलेली नाही. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरतीचे पास देण्यात येत आहेत. पण, कोरोनाच्या महामारीमुळे पास वितरणाची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. परंतु, तरीही पैशांची मागणी करत पास देण्याची अट ठेवल्याची घटना घडल्यास त्याबाबत चौकशी करण्याबाबतचे निवेदन देण्यात येईल.
– सचिन तांबे (माजी विश्वस्त, साईबाबा संस्थान-शिर्डी)

