लखमीपूर खैरी प्रकरणी संगमनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! दहशतीच्या राजकारणाला योग्यवेळी जनताच उत्तर देईल : ना.थोरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर प्रदेशातील लखमीपूर खैरी येथे शेतकर्‍यांना चिरडण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीद्वारा पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संगमनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतेक आस्थापना आज सकाळपासूनच बंद होत्या. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून यापूर्वीच जाहीर दवंडी देण्यात आल्याने भाजीबाजारातही शेतकर्‍यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात रोडावली होती. काही भागातील किरकोळ दुकाने वगळता या बंदला संगमनेर शहरात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नेहरु चौकापासून फेरी काढून व्यापार्‍यांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहनही केले.

मागील आठवड्यात उत्तर प्रदेशातील लखमीपूर खैरी येथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या समूहात महिंद्रा थार वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याचे नाव समोर आल्यानंतर शेतकरी संघटनांसह देशभरातील विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. शांततेने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर वाहन घालून त्यांना चिरडून मारण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीच्या इतिहसात सगळ्यात कलंकित असलेल्या या घटनेवर पंतप्रधानांची चुप्पी अनाकलनीय आहे. देशभरात संताप निर्माण करणार्‍या या घटनेचा निषेध करुन उत्तर प्रदेश सरकारने या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तिंना तुरुंगात टाकणे गरजेचे असतांना अख्खं योगी सरकार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची गोष्ट अत्यंत दुर्देवी असून सध्या घडत असलेला घटनाक्रम पाहता भविष्यात शेतकर्‍यांच्या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण झाल्यास आश्चर्य वाटू नये.

लखमीपूर खैरी घटनेत बळी गेलेल्या शेतकर्‍यांच्याप्रति महाराष्ट्रातील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरात या आंदोलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद जनभावना व्यक्त करणाराच आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यापारी वर्ग आधीच अडचणीत असतानाही त्यांनी आजच्या बंदला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या घटनेचा संताप अधोरेखीत करणारा असल्याचेही नामदार थोरात यावेळी म्हणाले. आपल्याला देशातील लोकशाही वाचवायची आहे. सध्या देशात दहशतीचे राजकारण सुरु असून त्याद्वारे सत्तेत राहण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजप सरकारचा हेतू लोकशाही पोषक नसल्यानेच महाविकास आघाडी नव्हेतर महाराष्ट्रातील जनताच या घटनेचा निषेध म्हणून आजचा बंद पाळीत आहे, याचे परिणाम भाजपाला भोगावेच लागलीच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सातच्या सुमारास नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष विश्वास मुर्तडक, शहर शिवसेना प्रमुख अमर कतारी, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, पालिकेचे सभापती किशोर टोकसे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा, शिवसेनेचे तुमसर संपर्कप्रमुख नरेश माळवे आदिंसह काँग्रेस, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त अ‍ॅड.सुहास आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बसस्थानकासमोर काहीकाळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहरात सर्वत्र चोख बंदोस्त तैनात केला होता.

Visits: 13 Today: 1 Total: 118543

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *