संगमनेरात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तुफान घोषणाबाजी! सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव; रस्ता रोखणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रभू श्रीरामचंद्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आज संगमनेरात आले. मात्र त्यांच्या येथे येण्यास संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला. सकाळच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्ग काहीकाळ रोखून धरण्यात आला होता. नंतर आव्हाड यांना अटक करण्याची मागणी करीत कार्यकर्त्यांचा एक गट तुफान घोषणाबाजी करीत कार्यक्रमस्थळाकडे निघाल्याने पोलिसांनी रस्त्यातच सर्वांना आडवून त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळीही कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज संगमनेरात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरात येणार असल्याचे जाहीर झाल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या अटकेसाठी दुपारी बाराच्या सुमारास बसस्थानकाजवळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथीला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजीमंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे) नेते भास्कर जाधव हे देखील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत दोन दिवशीय मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंचे आराध्य असलेल्या प्रभू रामचंद्रचंद्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
त्यांच्या त्या वक्तव्याचा संताप म्हणून संगमनेरातही गेल्या शुक्रवारी (ता.5) विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. आज जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते संगमनेरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच वेगवेगळ्या गटाने एकत्रित येत आव्हाड यांच्या उपस्थितीला विरोध करण्यास सुरुवात केली. बस स्थानकाजवळील रास्ता रोको आंदोलना दरम्यान आव्हाड या अटक करण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमस्थळासह संभाव्य आंदोलन होणाऱ्या ठिकाणी व शहरातील रहदारीच्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Visits: 36 Today: 1 Total: 118241