अखेर घारगावच्या ‘त्या’ पोलीस कर्मचार्याच्या मुसक्या आवळल्या! बेकायदा गर्भपात करणारा डॉक्टर मात्र अद्याप पसारच, पोलिसांनी ठोकले त्याच्या रुग्णालयाला ‘सील’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विवाह संबंध जुळविणार्या संकेतस्थळाचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवित तिला आपल्या जाळ्यात ओढून आठ महिने तिच्यावर अत्याचार करुन दोनवेळा तिचा गर्भपात करणारा व तिच्या दहा वर्षीय बालिकेवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारा घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर दुपारपर्यंत त्याला अटक होण्याची शक्यता आहे. तर संबंधित महिलेचा गर्भपात घडवून आणणारा आळे येथील ‘तो’ डॉक्टर अद्याप पसारच असून त्याचे निरामय हॉस्पिटल पोलिसांनी सील केले आहे. या वृत्ताला पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दुजोरा दिला आहे.

मुळच्या सोलापूर जिल्ह्यात राहणार्या एका 33 वर्षीय घटस्फोटीत महिलेने आपल्या पुनर्विवाहासाठी ऑनलाईन लग्नगाठी जुळविणार्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद केली होती. याचवर्षी 11 जानेवारी रोजी घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुनील यशवंत रत्नपारखी या कर्मचार्याची त्याच संकेतस्थळावरील नोंदीवरुन त्या महिलेशी ओळख झाली. संकेतस्थळावरील मोबाईल क्रमांकाचा आधार घेवून संबंधित कर्मचार्याने त्या महिलेशी संवाद साधला. त्यावेळी त्या महिलेने आपणास दहा वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करणार असाल तरच लग्न करण्याची अट घातली. संबंधित पोलीस शिपायाने आपणही घटस्फोटीत असून आपणास दोन मुली आहेत व त्या दोघीही आपल्यासोबतच राहतात असे त्या महिलेला सांगीतले. त्यावरुन त्या दोघांचीही लग्नावरुन परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या कर्मचार्याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठले. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या आई व भावांशी चर्चा करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दिवसापासून तो मोबाईलद्वारे दररोज त्या महिलेच्या संपर्कात राहीला. या दरम्यान फेब्रुवारीमध्ये एक दिवस त्याने आपले आपल्या घटस्फोटीत बायकोशी भांडण झाले असून माझ्या दोन्ही मुलीला ती घेवून गेली असल्याचे सांगीतले, व त्यानंतर काही दिवसांनी मी एक मुलगी सोबत आणली असून तशी नोटरी केल्याचेही त्याने त्या महिलेला कळविले. माझ्या मुलीची परीक्षा असल्याने त्याने तिला घारगावला येण्याची गळ घातली.

त्यानुसार 17 फेब्रुवाररोजी सदर महिला सोलापूरहून शिर्डीत आली व संबंधित कर्मचार्याने तिला शिर्डीतून थेट घारगावला आणले. त्या दिवशी त्या कर्मचार्याला रात्रपाळी असल्याने त्याने त्या महिलेला तिच्या व स्वतःच्या मुलीसह आपल्या खोलीवर ठेवले व तो निघून गेला. मात्र मध्यरात्री तो परत घरी आला तेव्हा दोन्ही मुली झोपलेल्या होत्या. त्या संधीचा फायदा घेवून त्याने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. मात्र घारगाव तिच्यासाठी नवीन असल्याने व त्यातच अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी असल्याने ती रात्रभर तशीच राहीली. दुसर्या दिवशी त्या महिलेच्या आईने फोन केला असता त्याने आपल्या मुलीच्या परीक्षेचे कारण पुढे करुन काही दिवस सदर महिलेला घारगावला राहू द्यावे, आम्ही लग्न करणारच असल्याचे सांगीतले.

त्यानंतर त्या महिलेने लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली असता 19 फेब्रुवारीरोजी त्याने मंगळसूत्र व जोडवे आणून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. नंतर चार दिवसांनी सदर महिला दोन्ही मुलींना घेवून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावी गेली व काही दिवस थांबून रत्नपारखी याच्या मुलीची परीक्षा असल्याने तिला घेवून पुन्हा घारगावला आली. त्या दरम्यान त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचाराचा सिलसिला सुरुच ठेवला. त्यातून तिला दोनवेळा गर्भधारणा झाली, ही गोष्ट समजताच त्याने गर्भपात करण्याचा आग्रह सुरु केला. मात्र सदर महिला त्याच्या विरोधात ठाम असल्याने अखेर त्या पोलीस कर्मचार्याचे नातेवाईक असलेले अकोले तालुक्यातील अमोल कर्जुले व त्याची आई यांनी घारगावात येवून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव आणला. या कालावधीत या नराधमाने त्या महिलेच्या दहा वर्षीय बालिकेवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित पोलीस शिपायाने अकोल्यातील त्या दोघांच्या मदतीने आळे येथील डॉ.व्ही.जी.मेहेर यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये बळजोरीने तिचा बेकायदा गर्भपात केला. यासर्व प्रकारावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या अबलेने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी स्वतः घारगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन त्या महिलेची कैफीयत ऐकली व त्यानुसार संशयित आरोपी पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी याच्या विरोधात बलात्कार, शिवीगाळ व मारहाण, अॅट्रोसीटी व पोस्कोतंर्गत, बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ.व्ही.जी.मेहेर याच्यावर, तर त्या पोलीस शिपायाच्या गैरकृत्याला साथ देणार्या अकोले येथील अमोल कर्जुले व त्याच्या आईवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो पोलीस शिपाई आणि आळ्याचा डॉक्टर दोघेही पसार झाले होते. त्या दरम्यान पोलिसांनी अमोल कर्जुले याला अटक केली, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर मुख्य आरोपी सुनील रत्नपारखी याला आज (ता.25) ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरचे निरामय हॉस्पिटल गेल्या सोमवारी (ता.21) पोलिसांनी सील केले असून तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

संगमनेर तालुक्याच्या इतिहासात अलिकडच्या काळात बहुधा पहिल्यांदाच चक्क पोलीस कर्मचार्यावरच इतक्या गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सर्वप्रकारचा दबाव झुगारुन या प्रकरणाची निःष्पक्ष चौकशी करुन संबंधित पोलीस कर्मचार्यासह त्याला साथ देणार्यांवरही गुन्हे दाखल केले. तेव्हापासून पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत असून आता मुख्य आरोपीच पोलिसांच्या हाती लागला आहे. बेकायदा गर्भपात करणारा व सध्या पसार असलेला आळ्याचा डॉ.व्ही.जी.मेहेरही लवकरच गजाआड असेल असा विश्वास यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दैनिक नायकशी बोलताना व्यक्त केला.

