संगमनेर नगरपालिकेने भिंतीही केल्या बोलक्या! स्वच्छता सर्वेक्षणातंर्गत चार ठिकाणी व्हर्टिकल उद्यांनाचीही झाली निर्मिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर स्वच्छतेचा मंत्र घेवून झपाटल्यागत काम करणार्या संगमनेर नगरपालिकेने 2020 च्या स्वच्छता सर्वेक्षणात हागणदारी मुक्तीत देशाच्या पश्चिम विभागात पाचव्या क्रमांकावर बाजी मारली होती. आता 2021 च्या स्वच्छता सर्वेक्षणात दैनंदिन स्वच्छतेसह पालिकेच्या घंटागाड्यांद्वारा दररोज शंभर प्रकारच्या कचर्याचे वर्गीकृत संकलन आणि त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीयेवर जोर दिला जात असून नगराध्यक्षा दुर्गा तांबे व मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली पालिकेच्या आरोग्य विभागासह संपूर्ण नगरपालिकाच त्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय ‘स्वच्छ-सुंदर व हरित’ शहराची संकल्पना पूर्ण होवू शकत नसल्याने प्रत्येक संगमनेरकराने या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहनही नगराध्यक्षा तांबे यांनी केले आहे. त्यासाठी जनजागृतीची मोहिमही सुरु करण्यात आली असून शहरातील अबोल भिंतीही स्वच्छतेचा मंत्र देवू लागल्या आहेत. शहरातील विविध चार ठिकाणी व्हर्टिकल उद्यानांची निर्मिती करण्यात आली असून ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून संगमनेरकर तेथे गर्दी करीत असल्याचेही दृष्य दिसत आहे.

केवळ शहरातील दैनंदिन स्वच्छतेपूरते कार्य न करता आपलं शहर अधिक सुंदर कसं दिसेल या विचारातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहे. शहरात दररोज जमा होणार्या शेकडों टन घनकचर्याचे सुयोग्य पद्धतीने वर्गीकरण करुन संगमनेर खुर्दमधील पालिकेच्या कचरा डेपोमध्ये त्यावर प्रक्रीया करुन उत्तम प्रतिचे कंपोस्ट खत तयार केले जाते. या खताला मोठी मागणी असून त्याद्वारे पालिकेला चांगले उत्पन्नही मिळत आहे. त्यासोबतच याच ठिकाणी पाच टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पही कार्यान्वीत असून त्याद्वारे वीज निर्मिती केली जात आहे. प्रक्रीया केंद्रातील संपूर्ण यंत्र व अन्य साधनांसाठी याच वीजेचा वापर केला जात आहे.

संगमनेर शहराची बाजारपेठ इतिहासापासून प्रगत आहे. त्यामुळे येथे केवळ अहमदनगर जिल्हाच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील ग्राहकांचीही नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे पालिकेने शहरातंर्गत रस्त्यांच्या दैनंदिन स्वच्छतेचे निकषही बदलले असून दिवसा संपूर्ण शहराची साफसफाई झाल्यानंतर व्यापारी क्षेत्र असलेल्या भागांमध्ये रात्रीही दुसर्यांदा शहर स्वच्छ केले जाते. त्यासोबतच माहिती-जागृती-संवाद या त्रिसूत्रीचा अवलंब करुन ओला व सुका कचरा, प्लास्टिक, घरातील व वैद्यकीय घातक कचरा याबाबत पालिकेकडून जनजागृती मोहीमही सुरु असून सर्व घंटागाड्यांद्वारे दररोज प्रभागनिहाय जागृतीचा प्रयोग राबविला जात आहे. याशिवाय नगराध्यक्षा दुर्गा तांबे व मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारीही या मोहीमेत खांद्याला खांदा देवून परिश्रम घेत आहेत.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या संकल्पनेतून शहरातील बसस्थानक परिसर, नामदार निवास रस्ता, भूमी अभिलेख कार्यालय व स्टेट बँक परिसरात व्हर्टीकल उद्यानांची निर्मिती केली गेली असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. या उद्यानांच्या ठिकाणी ‘माझं संगमनेर’ असे विद्युत रोषणाई असलेले आकर्षक फलक लावले गेल्याने प्रत्येक शहरवासियाला आपल्या गावाविषयी आत्मियता वाटत आहे. पालिकेची ही व्हर्टीकल उद्याने तरुणाईलाही आकर्षित करीत असून संगमनेरातील नवे ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून परिचित होत आहेत.
नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी पालिकेने शहरातील विविध भागातील भिंतींमध्येही प्राण ओतण्याचा संकल्प हाती घेतला असून आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे रंगविली जात आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या सौंदर्यातही भर पडत आहे. येणार्या कालावधीत शहरातंर्गत रस्त्यांचे नूतनीकरणही केले जाणार आहे. सध्या शहराच्या रस्त्यारस्त्यावर दिसणार्या विद्युत वाहिन्यांचे जाळे जमिनीखालून नेण्याचे काम सुरु असून त्यानंतर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे येणार्या नव्या वर्षात संगमनेरकरांना आपल्या शहराचा चेहरामेहरा बदललेा दिसेल हे मात्र निश्चित.

स्चच्छता सर्वेक्षण 2021 च्या निमित्ताने संगमनेर नगरपालिकेद्वारा विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरात चार ठिकाणी व्हर्टीकल उद्यानांची निर्मिती पूर्ण झाली असून उपनगरातील काही ठिकाणी काम सुरु करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने याबाबतचे संदेश देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छता संदेशासोबतच स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी चित्रेही चितारली गेली आहेत. सध्या शहरातंर्गत विद्युत वाहिन्या जमिनीखालून नेण्याचे काम सुरु असल्याने रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण होवून शहर धुळमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे.
दुर्गा तांबे
नगराध्यक्षा : संगमनेर नगरपरिषद
![]()
