शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातूनही संगमनेरकरांना पुन्हा धक्का! अवघ्या बारा तासांतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत पंच्चावन्न रुग्णांची पडली भर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या विश्रांतीनंतर जिल्हा रुग्णालयातील कोविड स्त्राव चाचणी प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून त्यातून संगमनेरकरांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गेल्या मोठ्या कालावधीपासून स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून खासगी प्रयोगशाळा आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा रुग्णांची स्त्राव तपासणी सुरु झाल्याने जिल्हा प्रयोगशाळेकडे अभावाने स्त्राव पाठविले जात होते. मात्र गेल्या कालावधीत खासगी प्रयोगशाळांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे वृत्त पसरल्याने प्रशासनाने सोमवारी जिल्हा प्रयोगशाळेकडे स्त्राव पाठविले होते, त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातून शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील एकोणावीस रुग्णांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज भल्या सकाळीच तालुक्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा भर पडल्याने अवघ्या बारा तासांतच तालुक्याची रुग्णसंख्या तब्बल 55 ने वाढून 1 हजार 450 वर पोहोचली आहे.

गेल्या महिन्याभरापासून स्थानिक आरोग्य यंत्रणेने संगमनेरातील स्त्राव चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले आहेत. या चाचण्यासांठी रॅपीड अँटीजेन प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याने जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविल्या जाणार्या स्त्राव नमुन्यांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून केवळ अँटीजेन व खासगी प्रयोगशाळांकडेच स्त्राव पाठविण्यात येत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात नाशिक येथील लाइफकेअर रुग्णालयातील गणदीप डायग्नोस्टिकचा चालक गणेश येवला याचे कारनामे समोर आल्याने खासगी प्रयोगशाळांच्या अहवालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा शासकीय प्रयोगशाळेची वाट धरली असून त्यातून पहिल्याच अहवालाने 19 रुग्णांची भर घातली आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील माळीवाडा व खंडोबागल्ली परिसरात पुन्हा एकदा कोविडचा शिरकाव झाला असून तेथील 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तिंना लागण झाली आहे. त्यासोबतच नंदनवन वसाहतीत पहिल्यांदाच कोविडचा प्रवेश झाला असून तेथील 65 वर्षीय महिला, साळीवाडा परिसरातून 49 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, कुरणरोड परिसरातून 67 वर्षीय इसम, घासबाजारातून 36 वर्षीय महिलेसह 10 व पाच वर्षीय बालिका, शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटी भागातील 21 वर्षीय तरुण तर रहाणेमळा येथील 29 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 41 वर्षीय तरुण, चिकणी येथील 28 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 65 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 50 वर्षीय इसम, पानोडी येथील 55 वर्षीय महिला, तर पठारभागातील घारगावमध्ये पुन्हा एक रुग्ण समोर आला असून तेथील 55 वर्षीय इसम, जवळे बाळेश्वर येथील 29 वर्षीय तरुण व साकूरमधील 65 वर्षीय महिलेलाही संक्रमण झाले आहे.

मंगळवारी रात्री उशीराने प्राप्त झालेल्या खासगी आणि रॅपीड अँटीजेन चाचणीच्या अहवालातून शहरातील सात जणांसह तब्बल 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे तालुक्याच्या बाधित संख्येने मंगळवारीच चौदावे शतक ओलांडून 1 हजार 431 ची संख्या गाठली होती. आता आज सकाळीच त्यात शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून एकोणावीस जणांची भर पडल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येने साडे चौदाशेचा टप्पा गाठला आहे.

अवघ्या बारातासांपूर्वी वाढले होते 36 रुग्ण..
मंगळवारी (ता.25) खासगी प्रयोगशाळेद्वारा चौदा तर रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत 36 रुग्णांची नव्याने भर पडून बाधितांच्या संख्येने चौदावे शतक ओलांडले होते. मंगळवारच्या अहवालाने तालुक्यातील चंदनापूरीत कोविडचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. या अहवालातून तेथील तीन बालकांसह तब्बल अकराजणांना कोविडची लागण झाली. आजही त्यात आणखी एकने भर पडली. कालच्या अहवालातील आणखी एक बाब म्हणजे मंगळवारी शहरात केवळ सात तर तालुक्यात तब्बल 29 रुग्ण आढळून आले.

मंगळवारी (ता.25) खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या चौदा अहवालातून शहरातील सुतारगल्ली परिसरातील 57 वर्षीय पुरुष, अभिनव नगर परिसरातून 56 वर्षीय पुरुषांसह 54 व 25 वर्षीय महिला, मार्केट यार्ड परिसरातून 22 वर्षीय महिला, साळीवाडा भागातून 42 वर्षीय महिला, तर जनतानगर परिसरातून 57 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यासोबतच तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 55 वर्षीय पुरुष, रहिमपुर येथील 48 वर्षीय व 54 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथील 55 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरवाडी येथील 77 वर्षीय वयोवृद्ध इत्यादी अहवालही पॉझिटिव आले होते.

तर रॅपीड अँटीजेन चाचणीतून 22 जण बाधित असल्याचे समोर आले, त्यात राजापूर येथील 48, 45 व 24 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील तीस वर्षीय तरुण, निमगाव टेंभी मधील 47 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 45 वर्षीय महिला, तर चंदनापूरी मधून एकाचवेळी 45, 37, 25 व 20 वर्षीय पुरुषांसह 60, 32, 40 व 32 वर्षीय महिला, 13 आणि 12 वर्षीय बालिका तर तीन वर्षीय बालकाचा अहवालही पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच पठार भागातील साकुर येथील 56 व 45 वर्षीय पुरुषांसह 50 व 25 वर्षीय महिला तसेच कुरकुटवाडी येथून 62 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव आला होता. मंगळवारी तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 36 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 14 वे शतक पार करून 1 हजार 431 वर जाऊन पोहोचली होती. त्यानंतर आता अवघ्या बारा तासांतच त्यात आणखी एकोणावीस रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांनी साडे चौदाशेचा टप्पा गाठला आहे.

गेल्या महिन्यात 1 जुलैपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण समोर येत आहेत. जुलै महिन्यातील 31 दिवसात शहर व तालुक्यात मिळून एकूण साडेसहाशे रूग्ण समोर आले तर आठ जणांचा बळी गेला. तर या महिन्यात 1 ऑगस्ट पासून आतापर्यंत तालुक्याच्या रुग्ण संख्येत 655 रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत सात जणांचा बळीही गेला आहे. गेल्या दोन महिन्यातच तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 1 हजार 305 रुग्णांची भर पडण्या सोबतच पंधरा जणांचा बळीही गेल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती चिंताजनक बनली आहे.

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास खासगी प्रयोगशाळेकडून चौदा तर रॅपीड अँटीजेनकडून बावीस जणांचे अहवाल प्राप्त झाल्याने मंगळवारी तालुक्याने चौदाशे रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यात शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून पुन्हा एकोणावीस रुग्णांची भर पडल्याने अवघ्या बारा तासांतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 55 रुग्णांची वाढ होवून तालुक्याने साडे चौदाशे रुग्णसंख्येचे शिखर गाठले आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि अंगावरच आजार काढण्याच्या वृत्तीमुळे यापुढे अशी किती शिखरे ओलांडावी लागतील हे येणारा काळच सांगणार आहे.

