जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षांचा तुरुंगवास! तीन वर्षांपूर्वी निमगाव जाळीत घडलेल्या घटनेचा निवाडा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पैशांच्या देण्याघेण्यावरुन घालेल्या भांडणाचे रुपांतर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात झाल्याने दोघे गंभीर जखमी होण्याची घटना तीन वर्षांपूर्वी निमगाव जाळी शिवारात घडली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तिघांवर हत्येच्या प्रयत्नासह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याचा निवाडा झाला असून संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सतीष दशरथ आरगडे याला पाच वर्ष कैद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरीत दोन आरोपींना मात्र निर्दोष सोडण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत किरकोळ कारणावरुन दोघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. या केसमध्ये सरकारी पक्षाने तेरा साक्षीदारांसह सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी सतीश दशरथ आरगडे याला दोषी ठरवले.
निमगाव जाळी येथील शिवाजी सुकदेव आरगडे याने गावातीलच सतीश दशरथ अरगडे याच्या कडून घटनेच्या वर्षभरापूर्वी 10 हजार रुपये उसनवारी म्हणून व्याजाने घेतले होते. त्या रकमेवर वाढीव व्याज मिळावे यासाठी सतीशने त्याच्याकडे तगादा लावला होता. यावरुन दोघांमध्ये एकदा चांगली जुंपलीही होती. या प्रकरणात अनिता शिवाजी आरगडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. 5 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये याच कारणावरुन पुन्हा वाद झाले. त्यातूनच आरोपी सतीश अरगडे याने कोयत्याचा वापर केला.
सुरुवातीला आरोपीने शिवाजी आरगडे यांच्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केलं, मदतीला धावलेल्या त्याचा मोठा भाऊ संजय अरगडे याच्यावरही त्याने हल्ला केला. त्यात तेही गंभीर जखमी होवून त्यांच्या हाताचे हाड मोडले. यावेळी जवळच्या दुध डेअरीत दुध घालण्यासाठी आलेल्या शिवाजीचा दुसरा भाऊ संभाजी याने हा सारा प्रकार पाहून आरोपी सतीश अरगडे याला पाठीमागून कवळी मारुन त्याच्या हातातील कोयता जमिनीवर पाडला. यावेळी आरोपीची मामी शोभा वदक व तिचा मुलगा अजय या दोघांनी आरोपीला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर संभाजी आरगडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करुन तिघांवर दोषारोपपत्र दाखल केले. या दरम्यान शोभा व अजय वदक या दोघांची नावे गैरसमजातून फिर्यादीत आल्याचा जवाब फिर्यादीने नोंदविल्याने त्याबाबतचा अहवालही न्यायालयाला सोपविण्यात आला होता.
सरकारी पक्षाच्यावतीने विधीज्ञ बी.जी.कोल्हे यांनी तेरा साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. यासोबतच घटना घडत असतांना मोबाईलद्वारा केलेले छायाचित्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्याच्या सत्यतेची पडताळली आणि जखमींवर उपचार करणार्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांचा अहवाल या केसमध्ये महत्वाचा ठरला. तपासी अधिकारी पो.नि.कटके यांची साक्षही सरकारी पक्षाला भक्कम करणारी ठरली.
सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्ष व पुराव्यावरुन संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी आरोपी सतीश दशरथ अरगडे (वय 34, रा.निमगाव जाळी) याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलम 307 अन्वये दोषी पकडतांना पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड, कलम 504 अन्वये सहा महिने शिक्षा सुनावली. शोभा व अजय वदक यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाचे वकील बी.जी.कोल्हे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पो.हे.कॉ.दीपक बर्डे, महिला पो.कॉ.दीपाली दवंगे, सारीका डोंगरे, पो.हे.कॉ.प्रवीण डावरे, पो.ना.राम.लहामगे, लाटे यांनी भूमिका बजावली.