संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे चौदावे शतक! शहर व तालुक्यात मिळून आजही आढळले तब्बल छत्तीस रुग्ण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरू असलेले कोविड विषाणूंचे संक्रमण कायम असून आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत छत्तीस रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालातून तालुक्यातील चंदनापुरीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून तेथील तीन बालकांसह अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधितांच्या संख्येने आता 14 वे शतक ओलांडले असून रुग्णसंख्या 1 हजार 431 वर पोहोचली आहे. त्यासोबतच गेल्या 20 ऑगस्ट पासून तालुक्यातील तिघांचे बळीही गेले असून तालुक्यातील एकूण बळींची संख्या 26 वर पोहोचली आहे.
गेल्या महिन्यात 1 जुलैपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण समोर येत आहेत. जुलै महिन्यातील 31 दिवसात शहर व तालुक्यात मिळून एकूण साडेसहाशे रूग्ण समोर आले तर आठ जणांचा बळी गेला. तर या महिन्यात 1 ऑगस्ट पासून आतापर्यंत तालुक्याच्या रुग्ण संख्येत 636 रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत सात जणांचा बळीही गेला आहे. गेल्या दोन महिन्यातच तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 1 हजार 286 रुग्णांची भर पडण्या सोबतच पंधरा जणांचा बळीही गेल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती चिंताजनक बनली आहे.
आज खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहर व तालुक्यातील 36 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या अहवालातून शहरातील केवळ सात रुग्ण समोर आले असून तब्बल 29 रूग्ण ग्रामीण भागातून समोर आले आहेत. त्यात एकट्या चंदनापुरीतून तब्बल अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या 14 अहवालातून शहरातील सुतारगल्ली परिसरातील 57 वर्षीय पुरुष, अभिनव नगर परिसरातून 56 वर्षीय पुरुषांसह 54 व 25 वर्षीय महिला, मार्केट यार्ड परिसरातून 22 वर्षीय महिला, साळीवाडा भागातून 42 वर्षीय महिला, तर जनतानगर परिसरातून सत्तावन्न वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 55 वर्षीय पुरुष, रहिमपुर येथील 48 वर्षीय व 54 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथील 55 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरवाडी येथील 77 वर्षीय वयोवृद्ध इत्यादी बारा जणांचे अहवालही पॉझिटिव आले आहेत.
तर प्रशासनाने आज केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून 24 जण बाधित असल्याचे समोर आले असून त्यात राजापूर येथील 48, 45 व 24 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील तीस वर्षीय तरुण, निमगाव टेंभी मधील 47 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 45 वर्षीय महिला, तर चंदनापूरी मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून तेथील 45, 37, 25 व 20 वर्षीय पुरुषांसह 60, 32, 40 व 32 वर्षीय महिला, 13 आणि बारा वर्षीय बालिका तर तीन वर्षीय बाळाचा अहवालही पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच पठार भागातील साकुर येथील 56 व 45 वर्षीय पुरुषांसह 50 व 25 वर्षीय महिला तसेच कुरकुटवाडी येथून 62 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव आला आहे. आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 36 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 14 वे शतक पार करून 1 हजार 431 वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्हावासीयांना आजही मिळाला मोठा दिलासा..
रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातच मयतांची वाढती संख्या यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोविड विषयी भीती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र कोविड हा भीतिदायक आजार नसून त्याचा पराभव करता येणे शक्य आहे. त्यासाठी स्वकाळजी घेण्यासोबतच लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतल्यास वयोवृद्ध इसमही पूर्णतः बरे होऊन घरी परतू शकतात हे जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी सिद्ध करून दाखवले आहे.
आजही जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तब्बल 567 रुग्णांनी उपचार पूर्ण केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात अहमदनगरच्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या 221, संगमनेर तालुक्यातील 47, राहाता तालुक्यातील 30, पाथर्डी तालुक्यातील 16, अहमदनगरच्या लष्करी क्षेत्रातून 23, श्रीरामपूर तालुक्यातून 16, श्रीगोंदे तालुक्यातून 31, पारनेर तालुक्यातून 39, अहमदनगर ग्रामीण क्षेत्रातून 26, कोपरगाव तालुक्यातून 55, जामखेड तालुक्यातून 36, कर्जत तालुक्यातून नऊ, लष्करी रुग्णालयातून सहा, अकोले तालुक्यातून 5, नेवासा तालुक्यातून चार, तर राहुरी, शेवगाव व अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा एकूण 567 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढीबरोबरच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही दररोज लक्षणीय वाढ होत असल्याने आजवर जिल्ह्यातील १४ हजार ५३१ रुग्णांनी उपचार पूर्ण करीत घर गाठले आहे.