अंघोळ करणार्‍या मुलीचे विकृताकडून मोबाईलद्वारे छायाचित्रण! संगमनेर तालुक्यातील संतापजनक घटना; हिंदुत्त्ववादी संघटनांची गावाकडे धाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
घरासमोर आडोसा करुन उभारलेल्या बिगर छताच्या स्नानगृहात अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमधून छायाचित्रण करण्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील चिंचोली गुरव परिसरातून समोर आला. या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी जवळच राहणार्‍या आरोपीला जाब विचारला असता त्याने उद्धटपणे उत्तरे दिल्याने संतापात अधिक भर पडली. या घटनेची माहिती मिळताच बजरंग दलासह विविध हिंदुत्त्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गावाकडे धाव घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन अकबर युनुस सय्यद या पंचवीस वर्षाच्या विकृताविरोधात ‘पोक्सो’तील तरतुदींसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या पीडितेला तब्बल अडीच तास पोलीस निरीक्षकांची वाट बघत बसावे लागल्याने तालुका पोलिसांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दहशतीचे राजकारण निर्माण करुन ते संपवण्याचे आश्‍वासन देत संगमनेरात परिवर्तन घडूनही तालुका पोलीस निरीक्षकांच्या मनमानी कारभारात मात्र कोणताच बदल होत नसल्याने आश्‍चर्यही व्यक्त होत आहे.


याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.10) तालुक्यातील चिंचोली गुरव परिसरात घडली. या भागात राहणारी व इयत्ता दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत फ्लेक्सचे कापड आणि बांबूचा वापर करुन आडोसा उभारलेल्या स्नानगृहात अंघोळीला गेली. यावेळी त्यांच्या घराजवळच राहणारा विकृत मानसिकतेचा अकबर युनुस सय्यद हा 25 वर्षांचा इसम तिच्याकडे निरखून बघत होता. काही वेळानंतर त्याने आसपासचा अंदाज घेत थेट ती मुलगी अंघोळ करीत असलेल्या आडोशा लगतच्या गवताच्या गंजीवर उडी घेतली. तेथे लपून तो उघड्या छताच्या स्नानगृहात अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे स्वतःजवळील मोबाईमधून छायाचित्रण करु लागला.


हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीने मोठ्याने आरडाओरड करीत आपल्या आईला बोलावले. मुलीचा आवाज ऐकूण तिची आई देखील धावतपळत आली. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. गेली अनेक वर्ष सहकुटुंब आपल्या घराजवळच राहणार्‍या अकबर युनुस सय्यदने हा प्रकार केल्याचे पीडितेने सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी थेट त्याच्या घरी जावून असे कृत्य का केले? असा जाब विचारला असता उलट त्यानेच त्यांना उद्धटपणे उत्तरे देत परतावून लावले. त्यामुळे त्यांचा राग अनावर होवून त्यांनी थेट पीडितेसह तालुका पोलीस ठाण्यात येवून हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक शालोमन सातपुते यांना घडला प्रकार सांगितला. त्यावेळी दुपारचे चार वाजले होते. खरेतर हा प्रकार ऐकताच क्षणी तालुक्याच्या सद्यस्थितीत ही घटना किती स्फोटक ठरु शकते याचा अंदाज येवून उपनिरीक्षकांनी तत्काळ निरीक्षकांना संदेश देण्याची गरज होती, कदाचित तसे घडलेही असावे.


मात्र सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अडीचतास पीडित मुलगी आपल्या पालकांसह केवळ पोलीस निरीक्षकांची वाट बघत तिष्ठत बसली होती. दाक्षिणात्य चित्रपटात शोभावे अशा आवेशात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांनी सदरचा प्रकार ऐकूण घेतल्यानंतर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला. खरेतर पोलीस निरीक्षकांनी स्वतः चौकशी केल्याने या प्रकरणात सुरुवातीलाच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसीटी) गुन्हा दाखल करण्याची गरज होती. मात्र ही गोष्ट रात्री उशिराने पोलीस उपअधिक्षकांनी पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर समोर आली आणि त्यानंतर उपनिरीक्षक सातपुते यांनी रात्री दहाच्या सुमारास पुरवणी गुन्ह्यासह कलमांची वाढ करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज न्यायालयासमोर हजर करुन त्याने केलेले छायाचित्रण मिळवण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी होणार आहे.


या प्रकरणात पोलीस निरीक्षकांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक शालोमन सातपुते यांचाही मोठा हातभार आहे. अतिशय संतापजनक आणि तालुक्याच्या सामाजिक स्वास्थाला धक्का लावणार्‍या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करण्याची गरज होती. मात्र प्रत्यक्षात खूद्द पीडितेला तक्रार देण्यासाठी तब्बल अडीच तास पोलीस ठाण्यात तिष्ठावे लागले. त्यातही सुरुवातीला केवळ पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला. रात्री उशिराने त्यात अ‍ॅट्रोसीटीची कलमं वाढवण्यात आली. एकीकडे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीसारख्या योजनांमधून महिला सक्षमीकरणाच्या घोषणा, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पैठणी महोत्सवातून मातृशक्तिचे गुणगान होत असताना तालुका पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या मनमानीतून वारंवार असे प्रकार घडत असल्याने मोठे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या घटनेनंतर बजरंगदलासह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी चिंचोली गुरवसह तालुका पोलीस ठाण्यातही गर्दी केल्याने काहीकाळ तणावही निर्माण झाला होता. मात्र आरोपीला अटक झाल्यानंतर तो निवळला.


गेल्या महिन्यात टोलनाक्यावरील हाणामारी प्रकरणातून तालुका पोलीस निरीक्षकांचा वादग्रस्त कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांसह शेकडों व्यापार्‍यांसमोर पोलीस निरीक्षकांच्या कारभाराचे वाभाडे काढीत या घटनांना तेच जबाबदार असल्याचा थेट आरोप केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी खूद्द निरीक्षकही हजर होते. दोन-दोन लोकप्रतिनिधी, त्यात एक सत्ताधारी म्हटल्यावर आता तालुका पोलीस निरीक्षकांची खैर नाही असे वाटत असताना ते पुन्हा एकदा दोन्ही लोकप्रतिनिधींवर भारी ठरले. त्यातही इतकं सगळं होवूनही त्यांनी आपल्या वागणूकीतही कोणताच बदल केल्याचे सोमवारच्या या घटनेतून दिसून आलेले नाही. त्यावरुन मोठे आश्‍चर्य निर्माण झाले आहे.


दहशतीच्या झाकणापासून सुरु झालेला विधानसभा निवडणुकीतील प्रचार शेवटी चाळीस वर्षांच्या दहशतीपर्यंत जावून पोहोचला होता. यावेळी वेगवेगळ्या फॅक्टरच्या परिणामातून संगमनेरात परिर्वनही घडले. निवडून आल्यानंतर विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील दहशत मोडून काढण्यासह अधिकार्‍यांना वेळेत लोकांची कामं करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मध्यंतरी कासटबंधू टोलनाका मारहाण प्रकरणात दोन विद्यमान लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक पानउताराही केला. मात्र या सगळ्यांचा कोणताही परिणाम तालुका पोलीस निरीक्षकांवर होत नसल्याचे सोमवारच्या घटनेत दिसून आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Visits: 61 Today: 2 Total: 313285

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *