दत्तात्रय कासार यांना ‘उजेडाचे मानकरी’ पुरस्कार जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्वदेश उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय कासार यांनी ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ हा उपक्रम संगमनेर तालुक्यात विविध विभागांच्या मदतीने यशस्वीपणे राबविला आहे. त्याची दखल बेटी बचाओ अभियानाच्या प्रवर्तिका डॉ.सुधा कांकरिया यांनी घेऊन ‘उजेडाचे मानकरी’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल कासार यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.सुधा कांकरिया यांच्या बेटी बचाओ अभियानाच्या माध्यमातून दत्तात्रय कासार यांनी ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ हा उपक्रम संगमनेर तालुक्यात पंचायत समितीचा महिला व बाल विकास विभागा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने यशस्वीपणे राबविला. तसेच ग्रामसभेत ‘नकोशीला करुया हवेशी’ बाबतचा ठराव घेऊन उपक्रम राबविला. तसेच स्वदेश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातूनही आरोग्य शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, लर्निंग लायसन्स कॅम्प, युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन मेळावे, रक्तदान शिबिर, स्वदेश कला उत्सव आदिंबरोबर विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम हिरीरीने राबविले आहेत. याची दखल घेऊन डॉ.कांकरिया यांनी वरील पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, सदर पुरस्कार रविवार दि.27 डिसेंबर, 2020 रोजी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, महाराष्ट्र गाव सामाजिक परिवर्तनचे संचालक उमाकांत दांगट, पद्मश्री पोपट पवार, राहिबाई पोपेरे आदिंच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रकाश कांकरिया व डॉ.सुधा कांकरिया यांनी दिली आहे.

