खेलो इंडिया स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला! पहिल्याच दिवशी पाच सुवर्णपदकांची कमाई; पदतालिकेतही महाराष्ट्र अव्वल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हरयाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करीत पदतालिकेत पहिले स्थान पटकाविले आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच योगासनांचाही समावेश करण्यात आला असून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगानपटूंनी पहिल्याच दिवशी पाच सुवर्णपदकांसह एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. रविवारी झालेल्या योगासनांच्या सहा इव्हेंटसमध्ये ध्रुव ग्लोबलच्या स्पर्धकांनी ही सुवर्ण कामगिरी बजावली असून महाराष्ट्राला पाच सुवर्णपदकांसह सहा पदके मिळवून दिली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राने आत्तापर्यंत नऊ सुवर्णपदकांसह प्रत्येकी चार रौप्य व कांस्य पदकांसह अव्वल स्थान पटकाविले आहे.

हरयाणातील पंचकुला येथील तावू देवीलाल क्रीडा संकुलात खेलो इंडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. योगासनांना खेळांचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच त्याचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या योगासनांच्या महाराष्ट्र संघातील 22 जणांमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील 20 योगासनपटूंचा समावेश आहे. रविवारी योगासनांच्या दहा पैकी सहा इव्हेंटसमधील स्पर्धा पार पडल्या. त्यात वैयक्तिक व दुहेरी गटातील विविध प्रकारात महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करतांना पाच सुवर्ण व एका रौप्य पदकाची कमाई करीत महाराष्ट्राला पदतालिकेत अव्वलस्थानी नेवून पोहोचवले.

योगासनांच्या पारंपरिक गटात महाराष्ट्राच्या सुमीत बंडाळे याने सुवर्णपदक प्राप्त करीत योगासनांमध्ये महाराष्ट्र संघाचे खाते उघडले. तर मुलींच्या याच गटात ध्रुवच्याच तन्वी रेडीज् या योगासनपटूने रौप्यपदक मिळविले. मुलांच्या आर्टिस्टिक दुहेरी योगासन प्रकारात आर्यन खरात व निबोध पाटील यांच्या जोडीने, तर मुलींच्या गटात वैदेही मयेकर व युगांका राजम यांच्या जोडीने सुवर्णपदकांचीं कमाई केली. रिदमिक योगासन प्रकारात मुलांच्या दुहेरी गटात नानक अभंग व अंश मयेकर यांनी तर याच प्रकारातील मुलींच्या गटात स्वरा गुजर व गीता शिंदे यांनी महाराष्ट्राच्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. रविवारी पार पडलेल्या योगासन स्पर्धांच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी राज्याला पाच सुवर्णपदकांसह एका रौप्यपदकाची कमाई करुन देम महाराष्ट्राला सुवर्णतालिकेत अव्वलस्थानी नेवून पोहोचवले.

याशिवाय या स्पर्धेतील अन्य क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. वेटलिफ्टिंग प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या काजल सरगर व हर्षदा गरुड यांनी तर मुकुंद आहेर याने मुलांच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले. सायकलिंगमध्येही महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या संज्ञा कोकाटेने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर स्क्रॅचरेसमध्ये पूजा दानोळेने रौप्य व टीमप्रिंट प्रकारात पूजा दानोळे व आदिती डोंगरे यांनी रौप्यपदकांची कमाई केली. कुस्तीमध्येही महाराष्ट्राचाच बोलबोला बघायला मिळाला. या क्रीडा प्रकारात प्रगती गायकवाडने रौप्य तर अहमदनगरच्या धनश्री फंडसह कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कांस्यपदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या पदकांच्या राशीत भर घातली.

महाराष्ट्राने आत्तापर्यंत सर्वाधिक नऊ तर यजमान हरयाणाने सहा सुवर्णपदके मिळवली आहेत. योगासनांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगसनपटूंनी राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया युवा स्पर्धेत केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

