वाल्मिक चौधरींकडून ऊसतोड कामगारांना चादरींचे वाटप

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या सर्वत्र थंडीचा तडाखा चांगलाच वाढू लागला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी सकाळी सकाळी शेकोट्याही पहावयास मिळत आहे. त्यात साखर कारखाने सुरू झाल्याने अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आलेले आहेत. परंतु, थंडीच्या कडाक्यापासून ऊसतोड कामगार आणि त्यांच्या लहान मुलांचे संरक्षण व्हावे म्हणून समर्थ फर्निचर अँड मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून 35 ऊबदार चादर आणि मिठाईचे वाटप केले. त्यांच्या या अनोख्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकोले तालुक्यातील कळस गावाजवळ ऊसतोड कामगारांचा अड्डा आहे. येथे साधारण 35 कुटुंबे कोपी करून राहतात. या रस्त्याने दररोज ये-जा करणारे समर्थ फर्निचर अँड मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी यांची नजर ऊसतोड कामगार आणि त्यांच्या लहान मुलांकडे जात होती. त्यावर त्यांनी कडाक्याच्या थंडीपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांना ऊबदार कपडे देण्याचा निर्धार केला. त्युनसार नुकतेच त्यांनी कामगारांच्या अड्ड्यावर जाऊन सुमारे 35 चादर आणि मिठाईचे वाटप केले. यावेळी निरागस बालकांच्या आणि कामगारांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. चौधरी यांच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच गावातील तरुण कार्यकर्ते सागर वाकचौरे, कुणाल वाकचौरे यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी श्याम देशमुख, विनेश देशमुख, मच्छिंद्र भागवत, गणेश चौधरी, रामभाऊ वाकचौरे, दिनेश चव्हाण, गोकुळ वाघ, राहुल ढगे, विलास वाघमारे, यश चौधरी, पार्थ चौधरी आदी उपस्थित होते.

