… अखेर नेवाशातील दत्त मंदिराच्या प्रांगणाची झाली स्वच्छता! दैनिक नायकच्या वृत्ताची घेतली दखल; नगरसेवक बेहळेंचा स्वच्छतेसाठी पुढाकार
नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील बाजारतळ भागात असलेल्या श्री दत्त मंदिर प्रांगणात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. याबाबत दैनिक नायकने दि. 22 डिसेंबरच्या अंकात प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेऊन या भागाचे नगरसेवक संदीप बेहळे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करुन चकचकीत केला आहे. याबाबत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नेवासा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाजारतळावरील दत्त मंदिर हे घाणीच्या विळख्यात सापडले होते. आजूबाजूला डुकरे व मोकाट जनावरांच्या वास्तव्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले होते; याबाबत भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे व सहकार्यांनी नगरपंचायतचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत या भागातील नगरसेवक संदीप बेहळे यांनी पुढाकार घेऊन आपले कार्यकर्ते, दत्तभक्त व नगरपंचायतच्या कर्मचार्यांसमवेत स्वच्छता अभियान राबवून घाणीच्या साम्राज्यात अडकलेले श्री दत्त मंदिराचे प्रांगण चकचकीत केले. तसेच संरक्षक कठडे लावून हा भाग सुरक्षित केला आहे.
सध्या बाजारतळाच्या अग्रभागी नगरपंचायतच्यावतीने व्यापारी गाळे बांधण्याचे काम सुरू आहे. ही कामे सुरू असताना या भागात औदुंबर वृक्षाखाली असलेल्या व दत्त भक्त स्व.मोहनराव सुडके यांनी स्थापन केलेले पुरातन मंदिर दुर्लक्षित झाले होते. डुकरांसह मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपच्यावतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी स्वच्छता न केल्यास आणि कठडे न बांधल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रकरणी दैनिक नायकनेही प्रकाशझोत टाकला होता. अखेर नगरसेवक संदीप बेहळे यांनी पुढाकार घेत मंदिराचे प्रांगण स्वच्छ करुन चकचकीत केले आहे.
नगरपंचायतच्यावतीने येथे व्यापारी संकुलाचे काम सुरू असून, श्री दत्त मंदिरासाठी ही जागा आरक्षित केली आहे. या मंदिराच्या पायाभरणीलाही सुरुवात केलेली आहे. मंदिराचे काम श्री दत्तभक्तांच्या आर्थिक योगदानातून होणार आहे. त्यामुळे पुढील काळात या मंदिराला पूर्व वैभव प्राप्त कसे होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. यात राजकारण न आणता भाविकांनी भक्त म्हणून या मंदिर कामाला हातभार लावावा. तसेच दरवर्षी सर्व दत्तभक्तांना एकत्रित करून आपण दत्त जयंती येथे साजरी करत असतो. यावर्षी देखील छोटेखानी पद्धतीने ती साजरी करण्यात येईल. यासाठी गावकर्यांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी.
– संदीप बेहळे (नगरसेवक, नेवासा)
श्री दत्तात्रयांचे शहरासह तालुक्यात अनेक भाविक आहेत. त्यामुळे मंदिराला पूर्व वैभव प्राप्त करुन देणे हा भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न असून, राजकारणाचा नाही. त्यामुळे मंदिर निर्मितीसाठी आमचाही खारीचा वाटा असेल. आणि स्वच्छतेबद्दल तुमच्यासह सहकार्यांचे आभार.
– मनोज पारखे (शहराध्यक्ष, भाजप)