विखेंच्या बालेकिल्ल्यात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची चाचपणी राहाता तालुक्यातील तेवीस गावांत विखे समर्थकांचे वर्चस्व अधिक; आघाडी स्वतंत्र मंडळ देणार

नायक वृत्तसेवा, राहाता
माजी मंत्री तथा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडीने चाचपणी सुरू केली आहे. राहाता तालुक्यातील पंचवीस गावांत निवडणुका होत आहेत. त्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींवर विखे समर्थकांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. तेथे महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने हालतचाली सुरू झालेल्या आहेत.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे. तेथे आमदार विखे यांचा गट व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गट अशी सरळ लढत होईल. त्यात जेथे अस्तित्व असेल, तेथे थोरात गट राष्ट्रवादी व शिवसेनेला काही जागांपुरती संधी देईल. रामपूरवाडी व शिंगवे ही दोन गावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तेथे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटात लढत होईल. तिसरे मंडळ कदाचित विखे समर्थकांचे असू शकते.

राहाता तालुक्यातील उर्वरीत तेवीस गावांत विखे समर्थकांचे वर्चस्व अधिक आहे. त्यातील बर्‍याच गावांत विखे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहून निवडणुका लढवितात. जो विजयी होतो, ते विखे गटाचा म्हणून खुर्चीवर बसतो. पराभूत मंडळ देखील विखे समर्थक म्हणूनच पुढे कार्यरत राहते. यावेळी येथे महाविकास आघाडीचे स्वतंत्र मंडळ उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुरुवातीला खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या इच्छुकांची शिर्डी येथे बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडी विरुद्ध विखे असा सामना पहायला मिळणार आहे.

Visits: 164 Today: 2 Total: 1951691

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *