अकलापूरला दत्त जयंतीनिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोविड नियमांचे पालन करुन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर येथे शनिवारी (ता.18) होणार्या दत्त जयंतीनिमित्ताने कोरोना नियमांचे पालन करुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली.
या उत्सव कालावधीत शनिवारी पहाटे पाच वाजता अभिषेक, सकाळी सहा वाजता ध्वजारोहण, सकाळी आठ वाजता दीपप्रज्वलन, सकाळी 6 ते 7 होमहवन, सकाळी 7 ते 8.30 भजन, सकाळी 8.30 ते 9 महाआरती व नंतर महाप्रसाद, सकाळी 9 ते 11 दत्त भजनी मंडळ व परिसर, सकाळी 11 ते 12.30 काळूमाता प्रासादिक भजनी मंडळ सावरणे, दुपारी 12.30 महाआरती, दुपारी 12.30 ते 2.30 काळूमाता प्रासादिक भजनी मंडळ सावरणे, दुपारी 2.30 ते 4 भव्य पालखी व दिंडी सोहळ्याचे मंदिराकडे प्रस्थान, सायंकाळी 4 नंतर पालखी पूजन, पाळणा पूजन, सायंकाळी 4 ते 6 जन्मोत्सवानिमित्त मनोहर महाराज सिनारे यांचे हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 नंतर श्री दत्त मूर्तीचा अभिषेक, सायंकाळी 6 वाजता श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व महाआरती, सायंकाळी 7 नंतर महाप्रसाद, रात्री 8 नंतर हनुमान प्रासादिक भजनी मंडळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अकलापूर येथील दत्त महाराजांचे मंदिर हे स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे. याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली देखील याठिकाणी येऊन गेले होते. महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी आहे. तसेच संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी असलेल्या आणि गगनगिरी महाराज यांचे वास्तव्य लाभलेल्या पुण्यभूमीत हा उत्सव साजरा होत आहे. राज्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. दर गुरुवारी येथे आरतीचा सोहळा पार पडतो. त्यामुळे यावर्षीच्या दत्त जयंती उत्सवास भाविकांनी कोविडचे नियम पाळून उपस्थित राहावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त देवस्थानने केले आहे.