संगमनेर तालुक्यातील कोविड रुग्णवाढीची गती पुन्हा किंचित वाढली..! शहरातील अकरा जणांसह आजही 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोविडच्या संक्रमणाला सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीला चार रुग्णांपासून सुरु झालेले संक्रमण टप्प्याटप्प्याने साडेतिन हजारांवर पोहोचल्यानंतर आता शहरासह ग्रामीणक्षेत्रातील रुग्णवाढीचा वेग किंचित प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यातील कोविडचा आत्तापर्यंतचा प्रवास हेच सांगत आहे. त्यामुळे कोविड प्रादुर्भावाने त्रासलेल्या संगमनेरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील सहा दिवसाच्या तुलनेत आज तालुक्यातील रुग्ण वाढीला काहीशी गती प्राप्त झाली असून आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा केलेल्या स्राव तपासणीतून 53 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील अवघ्या अकरा जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या आता 3 हजार 557 वर पोहोचली आहे.

तालुक्यात एप्रिलपासून सुरु झालेला कोविडचा प्रादुर्भाव आज डोंगराएवढा झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या महिन्यात आत्तापर्यंत समोर आलेल्या रुग्णांची संख्या पन्नास अथवा त्यापेक्षा पेक्षा कमी होती. त्याचा सकारात्मक परिणाम तालुक्यातील रुग्णवाढ कमी होण्यात झाल्याने सप्टेंबरमध्ये असलेली प्रति दिवस 51 रुग्णांची गती कमी होवून ती आज 42 रुग्ण प्रति दिवसापर्यंत खाली आल्याने संगमनेरकरांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. या महिन्यात उष्णतेची लाट (ऑक्टोबर हिट) येण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील प्रादुर्भावात आणखी घट होईल असा वैद्यकीय जाणकारांचा अंदाज आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून 15 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून अडतीस जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात शहरातील अकरा जणांसह ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी गुंजाळवाडीतून 12 रुग्ण समोर आल्याने ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण वाढल्याचे दिसत होते, तर आज हिवरगाव पावसा, प्रतापपूर, सुकेवाडी, उंबरी बाळापुरसह गुंजाळवाडीतूनही दोनपेक्षा अधिक रुग्ण समोर आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या आज काहीशी फुगली. आजच्या अहवालातून शहरातील वाडेकर गल्ली परिसरातील 75 व 48 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौकातील 52 वर्षीय इसम, पावबाकी रस्त्यावरील 50 वर्षीय महिला, विद्यानगर मधील अकरा वर्षीय मुलगा, मालदाड रोडवरील 78 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकांसह 40 वर्षीय तरुण, जय जवान चौकातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व इंदिरा नगरमधील 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

त्यासोबतच आज तालुक्यातही 42 रुग्ण समोर आले, त्यात हंगेवाडी येथील 40 वर्षीय तरुण, कुरकुटवाडी येथील 37 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 60 वर्षीय महिलेसह 25 व 18 वर्षीय तरुण, तसेच बारा वर्षीय बालिका, नांदुरी दुमाला येथील 56 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 13 वर्षीय बालिका, चिकणी येथील 60 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 35 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 85, 85, 69 व 50 वर्षीय इसमांंसह 45 व 25 वर्षीय तरुण तसेच आठ वर्षीय मुलगा, निमगाव जाळी येथील 27 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 45 वर्षीय दोघांसह 15 वर्षीय मुलगा, रहिमपूर येथील 45 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 70 व 65 वर्षीय महिलांसक्ष 22 वर्षीय तरुणी व 28 वर्षीय तरुण,

नान्नज दुमाला येथील 61 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथील 13 वर्षीय बालिका, गुंजाळवाडीतील 51 वर्षीय महिलेसह 53 व 50 वर्षीय इसम, तसेच 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 54 वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 53 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 75 व 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी बुद्रुक येथील 42 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 36 वर्षीय तरुण, सांगवी येथील 53 वर्षीय इसम व पोखरी बाळेश्वर येथील 57 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आजच्या रुग्ण संख्येत या महिन्यातील उच्चांकी रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 3 हजार 557 वर पोहोचली आहे.

