मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अमोल वैद्य उत्तर नगर जिल्ह्यातील संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य
नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले आहेत. दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोले येथील पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.
अमोल वैद्य हे परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असून ही जबाबदारी अन्य पत्रकारावर सोपविण्यात येत आहे. वैद्य यांनी दोन दिवसांत आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना देखील त्यांना करण्यात आली आहे. उत्तर नगरमधील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, राहाता आदी तालुक्यातील परिषदेचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी अमोल वैद्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अमोल वैद्य हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध वर्तमानपत्रांत बातमीदार म्हणून काम केले आहे. पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील राज्य व जिल्हास्तरीय अनेक महत्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. अकोले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, सचिव, अध्यक्ष पदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे. याशिवाय रोटरी क्लब अकोलेचे ते संस्थापक अध्यक्ष असून 14 जिल्ह्यांच्या असलेल्या रोटरी डिस्ट्रिकट 3132 च्या पब्लिक इमेजचे चेअरमन पदाची जबाबदारीही त्यांनी यापूर्वी पार पाडलेली आहे. सुगाव खुर्दचे सरपंच पदही त्यांनी भूषविले आहे. अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सचिव, रोटरी डिस्ट्रिक्टवर ते काम पाहत आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे सहशिक्षक म्हणूनही ते सेवेत आहेत. या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.