बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना वन विभागाकडून मदत घारगाव वन परिमंडळांतर्गत येणार्या 43 पशुपालकांना सव्वातीन लाखांचे वितरण
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी संगमनेर तालुक्याचा पठारभाग चांगलाच लक्ष्य केला आहे. येथील जंगल क्षेत्रामुळे बिबट्यांचा संचार मोठा प्रमाणात वाढून पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले. यामध्ये घारगाव वन परिमंडळांतर्गत येणार्या गावांमधील शेतकर्यांचे पशुधन बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडले होते; त्यातील 43 पशुपालकांना वन विभागाने 3 लाख 22 हजार 500 रुपयांची मदत केली असल्याची माहिती घारगावचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहे. यामध्ये पशुंवरील हल्ल्यांसह मानवावरील हल्लेही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त केला आहे तर पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचेही प्रबोधन करत आहे. परंतु, भक्ष्याच्या शोधात जंगलाकडून मानवी वस्तीकडे बिबट्यांचा संचार वाढल्याने पाळीव प्राणी लक्ष्य होत आहे. यामध्ये घारगाव वन परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या गावांमध्ये काही महिन्यांपूर्वी बिबट्यांनी धुमाकूळ घालत शेळ्या, मेंढ्या, कालवड, ठार केल्याने पशुपालकांने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत वन विभागाने नुकसानग्रस्त 43 शेतकर्यांचे पंचनामे केले होते. या सर्व शेतकर्यांना त्यांच्या नावाने धनादेश देत 3 लाख 22 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामध्ये जे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत त्यांनाही लवकर भरपाई मिळणार असल्याचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी सांगितले. या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी उपाय योजावेत असे आवाहनही वन विभागाने केले आहे.