‘थार’ ने चक्क यमदुतालाच दिली हुलकावणी! उद्योजक नवले यांचे प्रसंगावधान; पर्यटकांचा जीव वाचला

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फोफसंडी गावाजवळ रस्त्याचे कडेला ज्येष्ठ पर्यटकांची टेम्पो ट्रॅव्हलर्स गाडी अडकली. कुणीही मदतीला नाही, रस्त्याच्या बाजूलाच खोल दरी. धो धो पाउस कोसळतोय. रस्ता निसरडा झालेला, गाडीमधील सर्वांचाच जीव टांगणीला लागलेला.

कधीही होत्याचे नव्हते होवू शकत होते पण पर्यटनाला आलेल्या संगमनेरचे युवा उद्योजक राकेश चंद्रकांत नवले यांच्या महिंद्रा थार गाडीने पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी ओढून बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.पुणे येथील निसर्ग दर्शन टुर्सचे राजु शेळके एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये जेष्ठ नागरिकांची सहल फोफसंडी पर्यटनाला घेऊन आले होते. दुपारच्या जेवणासाठी एका हॉटेलकडे जात असताना टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरून एक गाडी आली रस्ता अरुंद असल्याने दोन गाड्या पास होणे अवघड होते. टेम्पो ट्रॅव्हलर गाडी चालकाने गाडी थोडी रस्त्याचे कडेला घेतली मात्र रस्त्याचे कडेला चिखल असल्याने गाडीचे चाक चिखलात जाम गुंतल्याने गाडी अडकली. ड्रॉयव्हर गाडी काढण्याचे प्रयत्न करत होता मात्र गाडी निघत नव्हती तर शेजारीच दरी असल्याने गाडी त्यात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. गाडी बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता, तस तशी गाडी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कड्याकडे सरकत होती.

त्यामुळे प्रसंगावधान राखत सर्व पर्यटक गाडीतून खाली उतरले. गाडी लवकर काढली नाही तर शेजारील दरीत पडण्याचा धोका होता. त्यामुळे पर्यटक व आयोजक दोन्ही टेंन्शन मध्ये होते. गाडी काढण्यासाठी ट्रॅक्टर, पिकअप वाहन मिळतं का याची चौकशी सहल आयोजक राजु शेळके करत होते. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्याना गाडी बाहेर काढण्यासाठी मदत मिळते का पाहत होते मात्र त्याचीही गाडी अडकेल या भीतीने कुणीही तयार होत नव्हते. अशात समोरून एक काळ्या कलरची महिंद्रा थार गाडी येताना दिसली. त्यात संगमनेर येथील स्नेह पेट्रोल पंपाचे संचालक राकेश चंद्रकांत नवले होते. त्यांनी पर्यटकांची अडकलेली गाडी पाहताच ती त्यांच्या गाडीने ओढून बाहेर काढली.

Visits: 169 Today: 1 Total: 1597038
