नेवासा नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे दत्त मंदिराचे पावित्र्य धोक्यात

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील नगरपंचायतने केलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील बाजारतळ परिसरात असलेले श्री दत्त मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. याठिकाणी संरक्षक कठडे उभारावेत यासाठी भाजपच्यावतीने निवेदनाद्वारे नुकतीच मागणी करण्यात आली असून, दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बाजार तळावर पूर्वी दत्तभक्त स्व.मोहन सुडके यांनी औदुंबर वृक्षाखाली बांधलेले श्री दत्ताचे मंदिर आहे. या मंदिराजवळच नगरपंचायतने दोन वर्षांपासून गाळे बांधकाम सुरू केलेले आहे. गाळ्यांची उभारणी झाली असून उर्वरित कामे बाकी आहेत. मात्र या कामामध्ये या मंदिराचे संरक्षण करण्याची जबाबदारी नगरपंचायतकडे असताना त्यांनी सपशेल याकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकारी व कर्मचारी देखील इकडे फिरकत नाही, तर या भागातील नगरसेवकही याकडे गांभीर्याने बघत नसल्याने भाविकांमध्ये चीड व संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्वरीत उपाययोजना करून या भागात संरक्षक कठडे लावून परिसर व मंदिर स्वच्छ करून द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी दिला आहे. या निवेदनावर नगरपंचायतचे गटनेते सचिन नागपुरे, निरंजन डहाळे, सुनील वाघ, सतीश गायके, गोरक्षनाथ बेहळे, आप्पासाहेब गायकवाड, संदीप आलवणे, अजित नरुला, शहर उपाध्यक्ष राजेश कडू, आकाश कुसळकर, विठ्ठल लोखंडे, महेश लबडे, संजय गवळी आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 4 Today: 1 Total: 27181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *