सोनगाव जिल्हा बँक शाखेच्या सोनेततारण प्रकरणी एकवीस जणांवर गुन्हा दाखल सुवर्णपारखीसह दहा जणांना अटक; सोनगाव, सात्रळ पंचक्रोशीत उडाली खळबळ

नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणी 21 जणांवर 34 लाख 45 हजार 500 रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी (ता.19) रात्री राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुवर्णपारखी (गोल्ड व्हॅल्युअर) रात्री तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला राहुरी न्यायालयाने शनिवार (ता.26) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच दुपारी दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी (ता.21) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सुवर्णपारखी अरविंद विनायक नागरे (रा.टाकळीमियाँ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप बाळासाहेब अनाप, दिगंबर धोंडीबा जाधव, राजेंद्र भाऊसाहेब थोरात, भास्कर भाऊसाहेब अंत्रे, ज्ञानदेव पंढरीनाथ शिंदे, दत्तात्रय तुकाराम शेळके (सर्वजण रा.सोनगाव), शिवाजी लक्ष्मण अनाप, प्रेमकिरण संपतकुमार डुकरे, संजय रखमाजी बेल्हेकर, अविनाश आबासाहेब नालकर, अक्षय तुकाराम गडगे, दत्तात्रय विठ्ठल सिनारे, सचिन तुकाराम निधाने (सर्वजण रा.सात्रळ), गणेश कैलास वांदे (कोल्हार बु.), राजेंद्र शिवाजी हारदे (रा.तिळापूर), मुनीफ अब्दुल शेख (रा.पाथरे बु.), संदीप हरिभाऊ सजन (रा.अनापवाडी), नवनाथ गोपीनाथ पठारे (रा.रामपूर), शिवाजी संपत संसारे (रा.निंभेरे), दत्तात्रय विठ्ठल वाणी (रा.झरेकाठी) अशी आरोपींची नावे आहेत. पैकी दहा आरोपींना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले आहे. इतर दहाजण पसार आहेत.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता.राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळले आहे. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली.  बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोनगावचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या टप्प्यात 20 कर्जदारांसह सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सोनगाव, सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहे.

Visits: 86 Today: 3 Total: 1109411

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *