दळलेली भगर उपवास करणार्‍या भाविकांच्या जीवावर उठली…

दळलेली भगर उपवास करणार्‍या भाविकांच्या जीवावर उठली…
राहुरी तालुक्यातील पन्नास-साठ जणांना जुलाब व उलट्यांचा त्रास
नायक वृत्तसेवा, राहुरी
नवरात्रौत्सव नुकताच सुरू सुरू झाला आहे. घरोघरी महिला व पुरुषांनी नऊ दिवसांचे उपवास सुरू केले आहे. यासाठी साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा असा विविध किराणा माल ग्राहकांनी खरेदी केला आहे. त्यातील दळलेली भगर उपवास करणार्‍या भाविकांच्या जीवावर उठल्याचे नुकतेच समोर आले आहे.


भगरीच्या अन्नातून विषबाधा झाल्याने पन्नास-साठ जणांना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. म्हैसगाव येथे सर्वाधिक बत्तीस जणांनी रविवारी (ता.18) दुपारपर्यंत खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. राहुरी फॅक्टरी येथे सात-आठ जण, शेटेवाडी (देवळाली प्रवरा) येथे पाच जण, मुसळवाडी व गंगापूर येथे चार-पाच जणांना रात्री भगरीची भाकरी खाल्ल्यानंतर जुलाब व उलट्या सुरू झाल्या आहेत. गंगापूर येथील तीन जण लोणी येथे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे समजते. विषबाधा झालेल्या महिलांची संख्या जास्त आहे. म्हैसगाव येथे काही कुटुंबातील दोन-तीन महिलांना विषबाधा झाली आहे.


राहुरी फॅक्टरी येथे एका किराणा व्यापार्‍याकडून ठोक दराने दळलेली भगर खरेदी करून, ग्रामीण भागातील किरकोळ किराणा दुकानदारांनी विक्री केली. भगरीतून विषबाधा झाल्याचे समजताच किरकोळ किराणा विक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने ठोक विक्रेत्याशी संपर्क साधला. ठोक विक्रेत्याने दळलेली भगर ग्राहकांकडून परत बोलावून घ्यावी. त्यांचे पैसे परत करून, प्रकरण वाढू देऊ नका असा निरोप दिला.


दरम्यान, रविवारी सायंकाळी म्हैसगाव येथे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी आरोग्य पथकासह रुग्णांची घरोघर जाऊन तपासणी मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत म्हैसगाव येथे रुग्णसंख्या 58 वर पोहोचल्याचे ग्रामस्थ विलास गागरे यांनी सांगितले. म्हैसगाव येथे आदिवासीबहुल लोकसंख्या आहे. कोरोनाची तपासणी करावी लागेल. या भीतीने काही रुग्णांनी जुलाब व उलट्यांचा त्रास सहन करीत घरगुती उपचार सुरु केल्याचे समजते.


घोटी येथे भगर खरेदी करून श्रीरामपूर येथे दळली आहे. ती सुटी विकण्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीत एक किलोप्रमाणे भरून पॅकिंग केली. वीस वर्षांपासून विक्री करीत आहे, असे कधी घडले नव्हते. तालुक्यातील 25 किराणा दुकानदारांना ठोक विक्री केली आहे. त्यांच्याकडून दळलेली भगर परत बोलवली आहे.
– राजकुमार छाजेड (ठोक किराणा व्यापारी, राहुरी फॅक्टरी)


गावातील 32 जणांना जुलाब, उलट्या झाल्या. चौदा जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. इतरांना उपचारानंतर घरी सोडले आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख गावात आले आहेत. त्यांनी भगरीच्या शिल्लक भाकरी व दळलेली भगर ताब्यात घेतली आहे. किरकोळ व ठोक किराणा दुकानदार यांची चौकशी सुरु आहे.
– महेश गागरे (सरपंच, म्हैसगाव)

Visits: 22 Today: 1 Total: 118437

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *