राजूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या राजूर व शेंडी येथे झालेल्या चोर्यांत सहभाग; वरीष्ठ अधिकार्यांसह नागरिकांतून कौतुक

नायक वृत्तसेवा, राजूर
मोबाईल शॉपी फोडून घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांस राजूर पोलिसांनी तब्बल दोन-अडीच महिन्यानंतर मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईतून राजूर व शेंडी येथे झालेल्या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश करुन नागरिकांतील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तोफिक आयुब तांबोळी यांच्या अपना मोबाईल शॉपीमध्ये 27 ऑक्टोबर, 2020 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील 30 हजार 353 किंमतीचे इलेक्ट्रॉनिक सामान चोरून पोबारा केला होता. त्यानंतर तोफिक तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी गु.र.नं.272/2020 भा.दं.वि. कलम 461, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव, पो.कॉ.प्रवीण थोरात, मनोहर मोरे, दिलीप डगळे यांनी मिळून पुढील तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरच्या घरफोड्या व चोर्या करणारे विष्णू विठू सोडनर (रा.घाटघर) व सोमनाथ शिवाजी भुतांबरे (रा.समेशरपूर) हे दोघे घाटघर येथे लपून बसले आहे. माहिती मिळताच पथकाने तेथे छापा टाकत आरोपी विष्णू सोडनर व सोमनाथ भुतांबरे या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यांची चौकशी केली असता हा गुन्हा आम्ही दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.

सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी विष्णू सोडनर याच्यावर गु.र.नं.13/2017 भा.दं.वि. कलम 304, 341, 427, 323, 504, 34, गु.र.नं.57/2018 भा.दं.वि. कलम 302, 34 प्रमाणे असून सोमनाथ शिवाजी भुतांबरे यावर गु.र.नं.138/2018 भा.दं.वि. कलम 457, 380, गु.र.नं.159/2017 भा.दं.वि. कलम 457, 380 याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे अकोले पोलीस हद्दीत त्यांनी अनेक दरोडे, अत्याचार व चोर्या केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

दरम्यान, राजूर पोलीस ठाण्याचे धडाकेबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने मोठ्या चतुराईने आणि चाणाक्षपणे गुन्हेगारांचा माग काढला आहे. या सराईत गुन्हेगारांनी बर्याचदा पोलिसांना चकवा देत राजूर व शेंडी परिसरात मोठ्या चोर्या केल्या आहेत. परंतु, भयभीत असलेल्या जनतेला या कारवाईने दिलासा दिल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे विशेष आभार मानले आहे.

