योगासनांचा स्पर्धात्मक खेळांमध्ये समावेश! दिल्लीतील पत्रकार परिषदेत ध्रुव ग्लोबलच्या योगासनपटूंची सुंदर प्रात्यक्षिके

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्राचिन भारतीय परंपरा असलेल्या योगासनांचा आता स्पर्धात्मक खेळांमध्ये समावेश झाला असून युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयासह केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने गुरुवारी दिल्लीत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. त्यासोबतच राष्ट्रीय योगसन खेळ महासंघाला या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी मान्यता देण्यात आली असून महासंघाचे अध्यक्ष डॉ.ईश्वर बसवरेड्डी व महासचिव डॉ.जयदीप आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात नुकताच परीक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रमही आयोजित केला गेला होता. राष्ट्रीय खेल, खेलो इंडिया, शालेय खेळ तसेच विद्यापीठ खेळ व राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावरील स्पर्धेतही आता योगासनांचा समावेश खेळ म्हणून झाला आहे. महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष योगमहर्षि स्वामी रामदेव बाबा व महासचिव डॉ.एच.आर.नागेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन खेळ महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

गुरुवारी (ता.17) दिल्लीत केंद्रीय युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत योगासनांना खेळाचा दर्जा मिळाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यासोबतच या खेळाच्या वैश्विक प्रसार व प्रचारासाठी स्थापन झालेल्या योगासन खेळ महासंघालाही मान्यता देण्यात आल्याचे दोन्ही विभागांच्या मंत्री महोदयांनी जाहीर केले.
![]()
यावेळी क्रिडा मंत्री श्रीपाद नाईक यांनी योगासन स्पर्धा भारतीय योग परंपरेचा अविभाज्य अंग असल्याचे सांगितले. शेकडो वर्षांपासून अशा पद्धतीच्या स्पर्धा भारतात झाल्या आहेत. आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर अधिष्ठान प्राप्त झाल्याने या क्षेत्रातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना त्याचा निश्चितच मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आयुष मंत्री किरण रिजीजू यांनी योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रतिस्पर्धा निर्माण होवून वैश्विक पातळीवर योगाच्या प्रति आकर्षण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. खेलो इंडिया आणि विद्यापीठ खेळातही योगासनांचा समावेश करुन त्याद्वारे ऑलिम्पिक स्पर्धांची तयारी करण्याचाही उद्देश त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन्ही विभागांच्या मंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेनंतर संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील योगासनपटूंनी योगसनांची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं सादर केली. लवचिक शरीराद्वारे सादर झालेल्या या प्रात्यक्षिकांनी दोन्ही मंत्र्यांलयाच्या प्रमुखांसह उपस्थित अधिकारी व पत्रकारांना मंत्रमुग्ध केले. ध्रुव ग्लोबलचे योगसन प्रशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी सदरच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.

